अवघ्या दहा रुपयात उपलब्ध होणाऱ्या शिवभोजन थाळीला मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन, या थाळींची संख्या दुप्पट करण्यात आली आहे. शिवसेनेने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात राज्यातील जनतेला अवघ्या १० रुपयात शिवभोजन थाळी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार राज्यात सत्ता येताच या योजनेची सुरुवात झाली.
शिवभोजन थाळीच्या वाढत्या मागणीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या योजनेची व्याप्ती वाढवण्याचे आदेश अन्न व नागरी पुरवठा विभागाला दिले होते. त्यावरुन रोजच्या १८ हजारावरुन या थाळींची संख्या ३६ हजार करण्यात आली आहे. सध्या प्रत्येक शिवभोजन केंद्रावर दररोज कमाल १५० थाळी मिळायच्या, आता ही संख्या २०० करण्यात आली आहे.
अन्न व नागरी पुरवठा विभागाने त्यासंबंधीचे आदेश जारी केले आहेत. दररोज एक लाखापर्यंत शिवभोजन थाळया उपलब्ध करुन देण्याचे लक्ष्य आहे. शिवसेनेच्या बहुचर्चित शिवभोजन थाळीला भाजपाने दीनदयाळ थाळीच्या माध्यमातून उत्तर दिले आहे. पंढरपूरमधून या दीनदयाळ थाळी योजनेची सुरुवात झाली आहे. पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना डोळयासमोर ठेऊन या भाजपाने दीनदयाळ थाळीची सुरुवात केली.
0 comments:
Post a Comment
Please add comment