![]() |
ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा यांचा भाजपला टोला |
भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना आपल्या पहिल्या मंत्रिमंडळात सरदार बल्लभभाई पटेल नको होते', असे खोटे वृत्त पसरवणे हे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांचे काम नसून हे काम त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या आयटी विभागाकडे सोपवावे, असा सल्लावजा टोला ज्येष्ठ इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना लगावला आहे. परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्या ट्विटवरून देशभरात चर्चा सुरू झालीय. जयशंकर यांच्यावर टीका होत असताना आता इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी परराष्ट्र मंत्र्यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवत त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. यानंतर परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि इतिहासकार रामचंद्र गुहा यांच्यात ट्विटयुद्धच झाले.
व्ही. पी. मेनन यांच्या चरित्राच्या प्रकाशनानंतर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी हे वादग्रस्त ट्विट केले. ते ट्विटमध्ये म्हणतात, 'सरदार वल्लभभाई पटेल हे १९४७च्या पहिल्या मंत्रिमंडळात सामील व्हावेत असे पंडित नेहरूंना वाटत नव्हते आणि त्यांनी त्यांचे नाव पहिल्या मंत्रिमंडळाच्या यादीतून वगळले. हा एक चर्चेचा मुद्दा आहे हे स्पष्टच आहे. लेखिका आपल्या खुलाशासह आपल्या मतावर ठाम आहे.'
या मुद्द्यावरून इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी दोरदार टीकास्त्र सोडलं आहे. हा निव्वळ एक भ्रम असल्याचे गुहा यांनी म्हटले आहे. हा भ्रम असून तो प्रोफेसर श्रीनाथ राघवन यांनी 'द प्रिंट'मध्ये लेख लिहून तो नष्टही करून टाकला आहे. तसे पाहिले असता भारताच्या उभारणीचे काम करणाऱ्या नेत्यांदरम्यान असलेल्या वादाबाबतच्या खोट्या बातम्या प्रमोट करणं हे काही परराष्ट्र मत्र्यांचं काम नाही. त्यांनी हे काम भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलवर सोडलं पाहिजे, अशा शब्दात गुहा यांनी परराष्ट्र मंत्र्यांना टोला हाणला आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment