![]() |
खनिज तेल महागले |
खनिज तेलाच्या किंमतीत सलग तिसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. तेल उत्पादक संघटनेने (ओपक) उत्पादन कपातीचा मार्ग अवलंबल्यानंतर गुरुवारी आंतरराष्ट्रीय कमॉडिटी बाजारात खनिज तेलाचा भाव १७ सेंट्सने वाढला. सध्या तो प्रती बॅरल ५५.९६ डॉलरवर गेला आहे. दरम्यान, आज देशांतर्गत बाजारात पेट्रोलचा भाव स्थिर असून डिझेलमध्ये मात्र किरकोळ घसरण झाली.
चीनमधील करोना व्हायरसमुळे तेथील तेलाच्या मागणीवर प्रचंड परिणाम झाला आहे. यामुळे मागील काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमतीत मोठी घसरण झाली होती. जानेवारी महिन्यात खनिज तेलाच्या किमतीत २० टक्क्यांची घसरण झाली होती.
तेलाच्या किमतीत सातत्याने होत असलेल्या घसरणीने चिंतेत झालेल्या 'ओपेक' संघटनेने तेल उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला. दररोज ६ लाख बॅरल खनिज तेल उत्पादन कमी करण्यात आले. परिणामी बाजारातील तेल पुरवठा मर्यादीत झाला आहे. यामुळे सलग तिसऱ्या दिवशी खनिज तेलाच्या किमतीत वाढ दिसून आल्याचे जाणकारांनी सांगितले. सध्या १७ लाख पिंप खनिज तेल उत्पादन घेण्यात येत आहे.
दरम्यान, पेट्रोलियम कंपन्यांनी गुरुवारी डिझेल दरात ४ ते ५ पैशांची किरकोळ कपात केली. कंपन्यांनी सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोलचे दर स्थिर ठेवले. मुंबईत आजचा पेट्रोलचा भाव प्रति लीटर ७७.६० रुपये आहे. डिझेल ६७.९८ रुपये झाले आहे. नवी दिल्लीत पेट्रोलचा भाव ७१.९४ रुपये असून डिझेलचा दर ६४.८२ रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोलचा भाव ७४.५८ रुपये आणि डिझेलचा भाव ६७.१५ रुपये आहे. चेन्नईतसुद्धा डिझेलच्या दरात घसरण झाली आहे. आज चेन्नईत पेट्रोल दर ७४.७३ रुपये आणि डिझेल ६८.४५ रुपये आहे. १२ जानेवारीपासून कंपन्यांकडून इंधन दरात कपात करण्यात येत असल्याने पेट्रोल आणि डिझले साडेतीन रुपयांनी स्वस्त झाले आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment