पाच हजार वर्षात कोणत्याही हिंदू राजाने मशीद उद्धस्त केली नाही – गडकरी

पाच हजार वर्षांच्या इतिहासात कधीही कोणत्याही हिंदू राजाने एकही मशीद उद्धवस्त केली नाही. तसेच त्यांनी तलवारीच्या जोरावर कोणाचेही जबरदस्तीने धर्मांतर केलं नाही, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. आपली हिंदू संस्कृती प्रगतीशील, सर्वसमावेशक आणि सहिष्णू असल्याचेही ते म्हणाले. दिल्लीत आयोजित अखिल भारतीय स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनात ते बोलत होते.
गडकरी म्हणाले, “आम्ही मुस्लिम किंवा मुस्लिम संस्कृतीच्या विरोधात नाही. सर्वजण काफिर आहेत या प्रवृत्तीच्या आम्ही विरोधात आहोत. आमची संस्कृती संकुचित नाही, जातीयवादी नाही तसेच धर्मांधही नाही. जर भारताला भविष्यात जिवंत ठेवायचं असेल आणि तुम्ही सावरकरांना विसरुन गेलात तर भविष्यात चांगले दिवस राहणार नाहीत. मी हे खूपच जबाबदारीनं बोलत आहे.”
“छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांना कडक शिकवण दिली होती की, कोणत्याही धर्माच्या पवित्र स्थानाचा अपमान होता कामा नये. कोणत्याही धर्माच्या माहिला असतील त्यांच्याशी आईसारखा व्यवहार करायला हवा. त्याचबरोबर सावरकरांनी जी राष्ट्रवादी विचारांची शिकवण दिली ती आपल्यासाठी खूपच गरजेची आहे. जर त्याकडे आपण आता लक्ष दिलं नाही तर एकदा आपण देशाला दोन तुकड्यात विभागलेलं पाहिलं आहे. जर हेच कायम राहिलं तर आपल्या देशातच नव्हे तर जगात समाजवाद, लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता काहीही शिल्लक राहणार नाही.”, असेही गडकरी यावेळी म्हणाले.
सेक्युलर या शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता असा नाही तर सर्वधर्म समभाव असा आहे. हे हिंदू संस्कृतीचं नैसर्गिक स्वरुप आहे. आम्ही सर्व संस्कृतींचा सन्मान केला आहे. आमचं वैशिष्ट्य हे विविधतेत एकता आहे. आजच्या स्थितीत आपल्याला सर्वसमावेशक, प्रगतीशील असताना खऱ्या अर्थानं सर्वधर्म समभावासह पुढे जायचं आहे. मात्र, अल्पसंख्यांकांच किंवा इतर कोणत्याही समुदायाचं लांगुलचालन करणं म्हणजे सेक्युलर नव्हे, असंही गडकरी यांनी म्हटलं आहे.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment