![]() |
मनसेला निवडणूक आयोगाची नोटीस |
शिवरायांची राजमुद्रा असलेला भगवा झेंडा पक्षाचा अधिकृत ध्वज म्हणून स्वीकारणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राज्य निवडणूक आयोगानं नोटीस बजावली आहे. काही संघटनांच्या तक्रारीची दखल घेऊन आयोगानं हे पाऊल उचललं आहे.
महाराष्ट्रातील बदलत्या राजकारणाचा अंदाज घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं अलीकडंच झालेल्या पक्षाच्या राज्यव्यापी अधिवेशनात आपली राजकीय भूमिका बदलली. त्याची सुरुवात पक्षाचा झेंडा बदलून झाली. यापूर्वीचा चौरंगी झेंडा बदलून त्याजागी संपूर्णपणे भगवा ध्वज स्वीकारण्यात आला आहे. या ध्वजावर शिवरायांची राजमुद्रा आहे. त्यास राज्यातील काही संघटनांनी आक्षेप घेतला होता. तसंच, निवडणूक आयोगाकडं तक्रारही केली होती.
या तक्रारीची दखल घेऊन आयोगानं मनसेला पत्र पाठवलं आहे. संघटनांच्या तक्रारींवर योग्य ती कार्यवाही करा, असं आयोगानं मनसेला बजावलं आहे.
मनसेच्या स्थापनेच्या वेळी राज ठाकरे यांनी सर्वसमावेशक भूमिका घेताना झेंड्यामध्ये विविध रंग ठेवले होते. त्यात निळ्या, हिरव्या, भगव्या व पांढऱ्या रंगाचा समावेश होता. कालांतरानं मनसेनं सर्वसमावेशक भूमिकेत बदल करत मराठीचा मुद्दा हाती घेतला होता. मात्र, झेंड्याचा रंग कायम होता. मात्र राज्यातील राजकीय समीकरणं बदलल्यानंतर मनसेनं पुन्हा नवी भूमिका घेतली आहे. मराठी व हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या शिवसेनेनं काँग्रेस व राष्ट्रवादीचा हात धरला आहे. काँग्रेससोबत सत्तेत असल्यामुळं हिंदुत्व व मराठीची भूमिका घेताना शिवसेनेची मोठी कोंडी होणार आहे. हेच लक्षात घेऊन मनसे मराठीबरोबर हिंदुत्वाची कास धरली आहे. नवा झेंडा हा त्याचंच प्रतीक मानला जात आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment