आम्ही कुठे वार केला हे पाकिस्तानला चांगलं ठाऊक आहे – एअर फोर्स प्रमुख


“युद्धात शत्रूचे नेमके किती नुकसान झाले त्याचे विश्लेषण करण्याची क्षमता आपल्याला वाढवण्याची गरज आहे” असे महत्वपूर्णविधान एअर फोर्स प्रमुख आरकेएस भदौरिया यांनी बालाकोट एअर स्ट्राइकच्या वर्षपूर्तीला केले आहे. बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तळावर भारताच्या फायटर विमानांनी एअर स्ट्राइक केला. पण त्यात त्यांचे नेमके किती नुकसान झाले, हे फोटो किंवा व्हिडीओच्या माध्यमातून सरकार आज सांगू शकत नाही. त्या पार्श्वभूमीवर एअर फोर्स प्रमुख भदौरिया यांनी केलेले विधान महत्वपूर्ण आहे. त्यांनी एनडीटीव्हीला मुलाखत दिली.
बालाकोट एअर स्ट्राइकनंतर फोटो आणि व्हिडीओ दाखवा, यावरुन माहिती युद्धाची सुरुवात झाली. बालाकोट एअर स्ट्राइकमधून मिळालेला हा महत्वपूर्ण धडा आहे असे भदौरिया यांनी सांगितले.
बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक करताना एअर फोर्सने फोटो आणि व्हिडीओ फीडचा विचार केला होता. त्यासाठी स्पाइस-२००० या स्मार्ट बॉम्ब बरोबर क्रिस्टल मेझ मिसाइल्सही मिराज-२००० विमानामध्ये होत्या. या मिसाइलमध्ये व्हिडीओ फीड रेकॉर्ड़ करण्याची सुविधा होती. पण त्यावेळी वातावरण आड आले. बालाकोटमध्ये ढगांची गर्दी असल्यामुळे क्रिस्टल मेझ मिसाइल डागता आले नाही. त्याऐवजी स्पाइस-२००० बॉम्बने दहशतवादी तळावर हल्ला करण्यात आला. या बॉम्बमुळे संपूर्ण इमारत कोसळत नाही. पण आतमध्ये मोठया प्रमाणावर नुकसान होते.
“आपण शत्रूचे नेमके किती नुकसान झाले हे फोटोच्या माध्यमातून दाखवता आले असते तर नाराजीचे उमटणारे सूर कमी झाले असते” असे भदौरिया म्हणाले. बालाकोटमध्ये जैशच्या तळाचे किती नुकसान झाले ते अल्ट्रा हाय रेसोल्युशन सॅटलाइट फोटोमधून समोर आले. भारताने हे फोटो एका मित्र देशाकडून मिळवले. पण त्या देशाबरोबर करार असल्यामुळे हे फोटो सार्वजनिक करता येणार नाहीत. एनडीटीव्हीच्या रिपोर्टरने हे फोटो पाहिले आहेत.
” एअर स्ट्राइकच्या दुसऱ्या दिवशी उपग्रहाला ते फोटो मिळाले असते तर, आपण चांगल्या स्थितीमध्ये असतो. पण दुसऱ्या दिवशीही वातावरण खराब होते. पण आम्ही कारवाई केली, आमच्या ती क्षमता आहे” असे भदौरिया यांनी सांगितले.
“बालाकोटमध्ये आम्ही यशस्वी हल्ला केला. फोटो, व्हिडीओ प्रसिद्ध करणे हे आमचे पहिेले प्राधान्य नाही” असे भदौरिया यांनी स्पष्ट केले. “माहिती युद्धात ते मीडियामध्ये जे सांगतायत ते विसरुन जा, आम्ही जे केले ते आम्हाला आणि त्यांना चांगले ठाऊक आहे. तुम्ही तुमच्या भूमीचा वापर आमच्यावर दहशतवादी हल्ल्यांसाठी करु शकत नाहीत हा संदेश आम्हाला द्यायचा होता” असे भदौरिया म्हणाले.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment