उत्तरपूर्व दिल्लीतील शिव विहार परिसरात शुक्रवारी एका ६० वर्षीय व्यापाऱ्याचा मारहाणीदरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर दिल्ली हिंसाचारातील मृतांचा आकडा ४२ वर पोहोचला आहे. यापूर्वी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
मृत व्यक्तीचं आयुब अंसारी असं असून ते गाजियाबादमधील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. अद्याप या प्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहितीही पोलिसांनी दिली. “काही अज्ञात व्यक्ती माझ्या वडिलांना घेऊन घरी आले. त्यावेळी ते जखमी होती. त्यानंतर सकाळी सहाच्या सुमारास त्यांना जवळच्या स्थानिक दवाखान्यात नेण्यात आलं. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना जीटीबी रूग्णालयात हलवण्यात येत होतं. परंतु त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला,” अशी माहिती त्यांचा मुलगा सलमान यानं इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिली.
“मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू होता त्यामुळे माझे वडिल गेल्या काही दिवसांपासून घरातच होते. परंतु सकाळी चार पाचच्या सुमारात भंगार गोळा करण्यासाठी निघाले. काही अज्ञात व्यक्ती त्यांना घरी घेऊन आल्या तेव्हा मला जाग आली. वडिलांच्या डोक्याला, शरीरावर आणि पायांवर जखमा होत्या. त्यावेळी ते शुद्धीत होते आणि काही लोकांनी आपल्याला शिव विहार परिसरात थांबवून नाव विचारल्याचं सांगितलं. जेव्हा त्यांनी उत्तर दिलं त्यावेळी त्या लोकांनी त्यांना मारहाण केली,” अशी माहितीही त्यांनी दिली.
आपण पोलिसांकडे त्यांना रूग्णालयात नेण्यासाठी गाडी मागितली, परंतु त्यांनी गाडी दिली नसल्याचा दावाही सलमाननं केला. कोणतीही गाडी न मिळाल्यानं मी माझ्या वडिलांना जवळच्याच एका रूग्णालयात भंगार वाहून नेणाऱ्या गाडीवरून नेलं असल्याचंही त्यानं सांगितलं. त्या रूग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. “त्या ठिकाणी त्यांना दाखल करण्यासाठी ५ हजार रूपये हवे असल्यानं मला त्यांना रूग्णालयात दाखल करता आलं नाही,” असंही त्यांनं सांगितलं. “माझ्या वडिलांना उपचाराची गरज होती. म्हणून काही वेळानं त्यांना जीटीबी रूग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. परंतु रूग्णालयात जात असतानाच रक्तस्राव झाला आणि त्यांचा मृत्यू झाला,” असं सलमाननं सांगितलं.
0 comments:
Post a Comment
Please add comment