![]() |
'करोना विषाणूची लागण नसल्याचे प्रमाणपत्र द्या धक्कादायक प्रकार समोर |
'चीनमधून आलेल्या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र मागितले जात आहे. त्याबाबत काहींनी आरोग्य विभागाकडे विचारणा केली आहे. त्याशिवाय कर्मचाऱ्यांसंदर्भात कोणती काळजी घ्यावी याची माहिती कंपन्यांकडून विचारली जात आहे. कर्मचाऱ्याला कोणतीही लक्षणे नसल्यास त्याला भीतीचे कारण नाही; मात्र संबंधितांनी सुमारे १४ दिवस घरी राहून काळजी घ्यावी. एवढ्या दिवस कंपनीकडून सुट्टी घेतल्यास नोकरीवर परिणाम होण्याची भीती आहे. त्यामुळे ते कंपनीत रुजू होण्यास जात आहेत. आरोग्य विभागाकडून 'करोना'बाधित नसल्याचे प्रमाणपत्र दिले जात नाही,' अशी माहिती राज्य रोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.
नोकरीच्या निमित्ताने चीनमधून प्रवास करून आलेल्या काही कर्मचाऱ्यांना 'करोना विषाणूची लागण नसल्याचे प्रमाणपत्र द्या,' अशी मागणी कंपन्यांकडून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या संदर्भात या कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागाकडे तक्रारीही केल्या आहेत. काही कंपन्यांनी या कर्मचाऱ्यांबाबत काय काळजी घ्यावी, याबाबत विचारणा केल्याचे समोर आले आहे.
सध्या चीनमध्ये करोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. भारताच्या विविध भागांतून शिक्षण, नोकरी तसेच व्यवसायाच्या निमित्ताने अनेक नागरिक चीनमध्ये आहेत. तेथे विषाणूंचा उद्रेक झाल्याने सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तेथील काही भारतीय मायदेशी परतले आहेत; तर काही जण परतीच्या मार्गावर आहेत. काही जण चीनमधील विविध शहरांमध्ये व्यावसायिक दौऱ्यानिमित्ताने गेले होते. तेदेखील नुकतेच आले आहेत. त्यातील काही जणांना सर्दी, ताप, खोकल्याची लक्षणे दिसून आली आहेत. पुण्यातील नायडू रुग्णालयात काही जणांना संशयित म्हणून दाखल करण्यात आले आहे. त्यातील काही जणांच्या चाचण्या 'निगेटिव्ह' आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे; तर काही जण अजून निरीक्षणाखाली आहेत.
चीनमधून परतलेल्या एका कर्मचाऱ्याला कंपनीत न येण्याची सूचना कंपन्यांकडून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. 'चीनमध्ये जाऊन आल्याने तुम्हाला करोनाचा संसर्ग झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला 'करोना'चा संसर्ग झाला नाही असे प्रमाणपत्र आणून द्या,' अशा शब्दांत कंपनीने सूचना केली आहे. मुळात या कर्मचाऱ्याला कोणतीही लक्षणे नसल्याचे त्याच्या तक्रारीत म्हटले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून प्रमाणपत्र मागितले असल्याचे कंपनीकडून सांगितले जाते आहे. त्यामुळे संबंधित कर्मचारी 'करोना'च्या संसर्गाच्या भीतीबरोबरच कंपनीच्या नव्या आदेशामुळे आणखीनच घाबरलेल्या अवस्थेत आहेत. आरोग्य खात्यातील काही अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment