![]() |
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांची सडकून टीका |
माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे.आजच्या अर्थसंकल्पातून केंद्र सरकारने अर्थव्यवस्था रुळावर आणण्याची आशाच सोडली असल्याचं सिद्ध होतंय, असा दावा पी. चिदंबरम यांनी केला आहे.
चिदंबरम यांनी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारने आज सादर केलेल्या अर्थसंकल्पाची चिरफाड केली. मी पहिल्यांदाच सर्वात मोठं बजेट भाषण ऐकलं, असा चिमटा काढताना हे भाषण १६० मिनिटाचं होतं. या भाषणातून २०२०-२०२१साठी काय संदेश द्यायचा होता, हे मला कळलं नाही. या भाषणात मला कोणताही अविस्मरणीय विचार किंवा घोषणाही दिसली नाही, अशी टीका चिदंबरम यांनी केली.
अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याची आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची आशा सरकारने सोडली आहे. अर्थव्यवस्था संकटात आहे हे सरकारने मान्य केलं आहे. मात्र, अर्थव्यवस्था सुधारण्यावर त्यांचा विश्वास नाही, असा हल्ला त्यांनी चढवला. अर्थमंत्र्यांनी आर्थिक समीक्षा वाचली नाही का? असा सवाल करतानाच अर्थमंत्र्यांनी आर्थिक समीक्षा वाचलीच नसावी, असं मला वाटतं, असंही ते म्हणाले. जनतेला असा अर्थसंकल्प नको होता. त्यासाठी जनतेने भाजपला मतदान केलं नव्हतं, असा टोलाही त्यांनी भाजपला हाणला.
0 comments:
Post a Comment
Please add comment