बॉलिवूडची दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन झाल्यानंतर चित्रपट दिग्दर्शक-निर्माते बोनी कपूर आणि त्यांच्या मुलांमधील नातं अधिकच दृढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. बोनी कपूर बऱ्याच वेळा सोशल मीडियावर त्यांच्या कुटुंबाप्रतीचं प्रेम आणि मुलांविषयीची काळजी व्यक्त करत असतात. अलिकडेच त्यांनी एका मुलाखतीमध्ये त्यांच्या मुलांविषयी अनेक गोष्टी शेअर केल्या. यामध्येच त्यांनी अभिनेता सलमान खान याच्यासोबत नात्यात आलेल्या तणावाविषयीही भावना व्यक्त केल्या.
सलमान खान आणि बोनी कपूर यांनी ‘वॉण्डेट’ आणि ‘नो एण्ट्री’ अशा सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत होता तर बोनी कपूर यांनी चित्रपटाची निर्मिती केली होती. त्यामुळे या दोघांमध्ये मैत्रीचं नातं निर्माण झालं होतं. परंतु सध्या त्यांच्या नात्यामध्ये अर्जुन कपूरमुळे ओढाताण सुरु असल्याचं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर बोनी कपूर यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. तसंच सलमानच्या सल्ल्यामुळेच अर्जुन कपूर कलाविश्वात आल्याचं त्यांनी सांगितलं.
“अर्जुनला चित्रपट दिग्दर्शक होण्याची प्रचंड इच्छा होती. त्यामुळे त्याला अभिनेता म्हणून कलाविश्वात आणावं असं माझा कधीच हेतू नव्हता. परंतु सलमानने, अर्जुनला अभिनय क्षेत्रात प्रयत्न करायला हवेत असं म्हटल्यानंतर आम्ही अर्जुनची त्या दृष्टीने तयारी सुरु केली. एकेदिवशी सलमानने मला फोन करुन, अर्जुनमध्ये अभिनयासाठी आवश्यक असणारे सगळे गुण दिसून येतात असं सांगितलं. त्यानंतर मी अर्जुनला सलमानकडे पाठवलं. सलमानने अर्जुनला घडवण्यासाठी खूप मदत केली”, असं बोनी कपूर म्हणाले.पुढे ते म्हणातात, “दुर्दैवाने आता सलमान आणि माझ्यात पूर्वीसारखं नातं राहिलं नाही. या नात्यात तणाव निर्माण झाला आहे. परंतु अर्जुनचं करिअर घडविण्यासाठी त्याने जी मदत केली त्यासाठी मी कायम त्याचा ऋणी राहिन”.
दरम्यान, अरबाज आणि मलायका यांचा घटस्फोट झाल्यानंतर मलायका अर्जुन कपूरला डेट करत आहे. त्यांच्या याच नात्यामुळे सलमान आणि अर्जुन यांच्या मैत्रीमध्ये वितुष्ट आलं आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment