सामना मुलाखतीमधे काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आमदार म्हणून निवडून न येता मुख्यमंत्री किंवा कुठलंही मंत्रिपद स्वीकारल्यानंतर सहा महिन्याच्या आत निवडून येणं गरजेचं असतं. विधानसभा किंवा विधान परिषदेमधून त्यांना निवडून यावं लागतं. त्यामुळे मुख्यमंत्री थेट लोकांमध्ये जाऊन निवडणूक लढवितात की विधान परिषदेवर जातात याची सगळ्यांनाच उत्सुकता होती.
मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आज पहिल्यांदाच शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या 'सामना'ला मुलाखत दिले.

सामना मुलाखतीमधे काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...
परिषद की सभा?
तुम्हाला सांगू का! मुळात मुख्यमंत्री होण्याआधी मी त्या विधान भवनात आयुष्यात दोन-चार वेळेहून अधिक गेलो नसेन. असं देशात अपवादात्मक परिस्थितीत झालं असेल की, एखादी व्यक्ती जी तिकडे येण्याचं कधी स्वप्न नव्हतं ती व्यक्ती येते तेच मुख्यमंत्री म्हणून. मी नेहमी सांगतो, जबाबदारीतून मी कधी पळ काढलेला नाही आणि काढणार नाही. त्यामुळे कुणालाही न दुखावता जे शक्य असेल ते मी करेन. ताबडतोबीने आता मला वाटतं विधान परिषदा येतील. विधानसभेवर जायचं म्हणजे जो निवडून आला असेल त्याला राजीनामा द्यायला लावून परत निवडणुका घेऊन. विधान परिषदेपेक्षा माझे मत असे आहे की, ही जबाबदारी आली ती पार पाडण्यासाठी जर विधानसभेतून कुणालाही न दुखावता परिषदेत जाऊ शकत असेन तर का नाही जायचं? मागल्या दारातून, या दारातून, त्या दारातून हे सगळं बोलायला ठीक आहे. मग मी तर म्हणेन, मी छपरातून आलो आहे.
हिंदुत्व सोडलं का?
मी काय धर्मांतर केलंय? आणि तुम्ही म्हणाल तेच हिंदुत्व असं ब्रह्मवाक्य आहे की काय? की घटनेत लिहिलंय की, हे म्हणतील तेच हिंदुत्व. आपण म्हणजे सर्वज्ञानी, सर्वव्यापी असा आव कुणी आणू नये. आपण म्हणतो तेच खरं आणि बाकीचे म्हणतील ते झूठ हा हास्यास्पद दावा आहे. त्यांच्यापुरता हा दावा त्यांनी त्यांच्या कार्यालयात करायला हरकत नाही.यात दोन भिन्न विचारधारा, तीन भिन्न विचारधारा तुम्ही म्हणताय; पण केंद्रात जे सरकार आहे त्यात आता किती पक्ष आहेत? त्यांचे किती विचार आहेत?
नितीशकुमार आणि भाजपची विचारधारा एक आहे का? मेहबुबा मुफ्ती आणि त्यांची विचारधारा एक होती का? चंद्राबाबूंची एक होती का? ममता बॅनर्जी त्यावेळी सत्तेत होत्या त्यांची विचारधारा एक होती का? जॉर्ज फर्नांडिस यांची विचारधारा एक होती का? रामविलास पासवान आज त्यांच्यासोबत आहेत. त्यांची आणि भाजपची विचारधारा एक आहे का? आता झारखंडमध्ये काय घडलं? तिथं विचारधारा जुळली का? सगळं कसं आहे, झालं गेलं गंगेला मिळालं असं म्हणायचं. आपण घरात गंगाजल आणून ठेवतो तसंच.
राज्याचं हित महत्त्वाचं
एक लक्षात घ्या, प्रत्येकाच्या विचारधारा आहेत ना. आम्ही हिंदुत्ववादी आहोत आणि राहणारच. काँगेसची विचारधारा वेगळी आहे, पण दोन्ही, तिन्ही पक्ष किंबहुना या देशात जेवढे पक्ष आहेत त्यांचे उदाहरण घ्या. आपापल्या राज्याचं हित, देशाचं हित या विचारापेक्षा कोणी भिन्न आहे का? आम्हाला राज्याचं हित करायचं नाहीय का? देशाचं हित करायचं नाही का? देशात, राज्यात अराजक माजवायचंय का? आणि तरीही आम्ही तुमच्यासोबत येतोय असं म्हणून कोणी एकत्र आलेले नाहीय. कश्मीरमध्ये जी विचारधारेची गफलत झाली होती तशी इकडे झालीय का?
सत्ता नवीन नाही
मी प्रामाणिकपणे सांगतो की, सत्तेची खुर्ची ही माझ्यासाठी नवीन असली तरी सत्ता माझ्यासाठी नवीन नाही. शिवसेनाप्रमुखांनी जी सत्ता किंवा हुकुमत गाजवली ती मी जवळून बघितली आहे. मुख्य म्हणजे, त्यांनी ती जनकल्याणासाठी राबवली. त्यामुळे मला हे नवीन नाही.
महाराष्ट्राचा मंगल कलश
तो मंगल कलश पाहिल्यावर वाटलं, आजही संयुक्त महाराष्ट्राचं काम थोडं अपुरं आहे ही भावना नेहमी माझ्या मनात असते ती प्रकर्षाने त्या दिवशीही मनात आली. त्या मंगल कलशाबरोबरच माझे आजोबा मला सांगत त्या संयुक्त महाराष्ट्र लढय़ाच्या आठवणी, माझ्या वडिलांकडून ऐकलेल्या त्या समर प्रसंगाच्या आठवणी उचंबळून आल्या. मंत्रालयात जाण्याआधी मी हुतात्मा स्मारकात गेलो होतो. त्या वेळी त्या हुतात्म्यांना वंदन करून मी हेच सांगितलं होतं की, तुम्ही जे रक्त सांडलंय या महाराष्ट्रासाठी हे रक्त मी कदापि वाया जाऊ देणार नाही. तुमची अपेक्षा पूर्ण करण्याचा मी आटोकाट प्रयत्न करेन.

धक्क्यातून सावरलात का?

नाहीच वाटणार. याचं कारण मी शिवसेनाप्रमुखांचा पुत्र आहे, धक्के द्यायचे प्रयत्न अनेकांनी करून पाहिले, पण कोणालाच ते जमलं नाही. किंबहुना शिवसेनाप्रमुखांनी जे धक्के अनेकांना दिले त्यातनं ते लोक अजूनही सावरलेले दिसत नाहीत. हे क्षेत्र असं आहे की यात धक्का किंबहुना धक्काबुक्की गृहीत धरून चालायचे असते. मघाशी आपण सुरुवात करताना बुद्धिबळाच्या पटाचा उल्लेख केलात. बुद्धिबळ हा बुद्धीने खेळायचा खेळ नक्कीच आहे. पण त्यात विविध सोंगटय़ा किंवा काय म्हणतात… प्यादी, हत्ती, घोडे, राजा, वजीर, उंट या प्रत्येकाच्या चाली जर आपण लक्षात घेतल्या तर बुद्धिबळ खेळणं कठीण आहे असं मला वाटत नाही.
मुख्यमंत्रीपद धक्का होतं का?
नाही. एक लक्षात घ्या. मुख्यमंत्रीपद स्वीकारणं हा माझ्यासाठी धक्का नसला तरी माझं हे स्वप्न कधीच नव्हतं. अत्यंत प्रामाणिकपणानं हे मी कबूल करतो की, मी शिवसेनाप्रमुखांचं एक स्वप्न- मग त्याच्यात ‘सामना’ची निर्मिती असेल, शिवसेनेची वाटचाल असेल आणि माझ्यापुरतं म्हणाल तर मी म्हणजे स्वतः उद्धव याने त्याच्या वडिलांना म्हणजे बाळासाहेबांना दिलेलं वचन! त्या वचनपूर्ततेसाठी मी कोणत्याही थराला जायचं ठरवलं होतं. त्याही पुढे जाऊन मी एक गोष्ट स्पष्ट करतो की, माझं मुख्यमंत्रीपद ही वचनपूर्ती नाही, तर वचनपूर्तीच्या दिशेने टाकलेलं ते एक पाऊल आहे. ते पाऊल त्या दिशेने टाकताना मी मनाशी ठरवलेय की कोणत्याही थराला जायचं, पण मी माझ्या वडिलांना दिलेलं वचन पूर्ण करायचंच आणि ते मी करणारच.धक्के अनेक प्रकारचे असतात. लोकांना हे पटलंय की नाही पटलंय, आवडलंय का नाही आवडलंय हा महत्त्वाचा भाग आहे. मी अनेकदा या विषयावर बोललोय आणि जनतेलाही ते पुरेसं कळलंय. वचन देणं आणि वचन निभावणं यात फरक आहे. वचनभंग झाल्यावर साहजिकच दुःख आहे, रागही आहे. ‘त्यांनी’ कशासाठी हे केलं? का वचन दिलं आणि का वचन मोडलं? मग त्यांनी अशा पद्धतीने वचन मोडल्यानंतर माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता.
भाजप धक्क्यातून सावरला का?
मला माहिती नाही. पण माझं त्यांना असं म्हणणं आहे की, त्यांनी वचन पाळलं असतं तर काय झालं असतं! असं काय मी मोठं मागितलं होतं… आकाशातले चांद-तारे मागितले होते की काय मागितलं होतं! मी तर लोकसभा निवडणुकीच्या आधी आमच्या वाटाघाटी झाल्या तेव्हा जे आमच्यात ठरलं होतं तेवढंच मागितलं होतं.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment