उस्मानाबादमध्ये आजपासून साहित्य संमेलन

 उस्मानाबादचे आजपासून साहित्य संमेलन

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि आणि मराठवाडा साहित्य परिषद शाखा, उस्मानाबाद यांच्या वतीने हे ९३वे अखिल भारतीय 
मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाला शुक्रवारी सकाळी नऊ वाजता ग्रंथदिंडीने सुरुवात होईल. संत साहित्य आणि परिवर्तनवादी साहित्य मांडणारे ग्रंथ पालखीत असतील. सकाळी ११ वाजता ध्वजारोहण होईल. उद्घाटन कार्यक्रम सायंकाळी चार वाजता होणार आहे. या कार्यक्रमाला नियोजित संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो, मावळत्या संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे, उद्घाटक ज्येष्ठ कवी ना. धो. महानोर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील, साहित्य संमेलनाचे निमंत्रक नितीन तावडे यांची प्रमुख उपस्थिती असेल. यावेळी माजी संमेलनाध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. सदानंद मोरे, डॉ. श्रीपाल सबनीस आणि लक्ष्मीकांत देशमुख यांचा सत्कार करण्यात येणार आहे. संमेलनासाठी राज्यभरातील प्रकाशनांची २०० दालने उभारण्यात आली आहेत.


मराठी साहित्यविश्वात महत्त्वाचे स्थान असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास आज, शुक्रवारी येथे प्रारंभ होत असून, रविवारपर्यंत चालणाऱ्या या साहित्य सोहळ्यासाठी उस्मानाबादचे यजमान सज्ज झाले आहेत. नियोजित संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या नावाला काही कडव्या संघटनांचा विरोध असल्यामुळे संमेलन परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

'संमेलनाला जाऊ नका, अशी धमकी ब्राह्मण महासंघाने मला फोनवरून दिली आहे, तरीही मी उपस्थित राहणारच', अशी ठाम भूमिका ज्येष्ठ कवी व उद्घाटक ना. धों. महानोर यांनी 'महाराष्ट्र टाइम्स'कडे मांडली. दिब्रिटो यांच्या नावास विरोध असल्याने महानोर यांनी संमेलनास जाऊ नये, अशी भूमिका काही जणांनी याआधीही मांडली होती.

राजकारणी व्यासपीठावर नव्हे, पहिल्या रांगेत

या संमेलनाला राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोड, शिवसेना नेत्या नीलम गोरे यांच्यासह उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. मंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित असले तरी त्यांना व्यासपीठावर बसता येणार नाही अशी भूमिका महामंडळाने कायम ठेवली आहे. या मान्यवरांनी पहिल्या रांगेत बसून संमेलनाचा आनंद घ्यावा, असे संयोजकांनी सांगितले.

दिब्रिटो यांना पाठदुखीचा त्रास

नियोजित संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो हे उस्मानाबादमध्ये दाखल झाले आहेत. त्यांना पाठदुखीचा विलक्षण त्रास होत आहे. आज, शुक्रवारी ते उद्घाटनास उपस्थित असतील. अध्यक्षीय भाषणही करतील. मात्र नंतर ते किती काळ संमेलनात थांबतील, ते त्यांच्या प्रकृतीवर अवलंबून राहील, असे सांगण्यात आले.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment