बिडकीनला 500 एकरांत अन्न प्रक्रिया केंद्र; शेंद्रा येथे काैशल्य विकास संकुल
'आजवर फक्त भूमिपूजनांचे फलकच लागले, पुढे कामांना गती मिळालीच नाही. मात्र, यापुढे तसे हाेणार नाही. माझे सरकार घाेषणांना प्रत्यक्ष उतरवण्यासाठी काम करणार आहे. येथील शेतकरी, उद्योजकांना सक्षम करण्यास आपले प्राधान्य आहे. उद्योग आणि कृषी या दोन विभागांच्या समन्वयातून अन्नप्रक्रिया, तेलबिया प्रक्रिया यासारख्या शेतमालाशी निगडीत अन्नधान्य प्रक्रिया उद्योगांना मोठ्या प्रमाणात चालना देण्यात येणार आहे. त्यासाठी बिडकीन येथे ५०० एकर जमिनीवर अन्न प्रक्रिया केंद्राचे जून महिन्यात भूमिपूजन केले जाईल. तसेच, नंतर गतीने हे काम पूर्ण केले जाईल. विशेष म्हणजे यापैकी १०० एकर जमीन ही महिला उद्याेजकांसाठी राखीव असेल,' अशी महत्त्वपूर्ण घाेषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी औरंगाबादेत केली. तसेच, 'ऑरिक' सिटीत घोषित झालेले पण अस्तित्वात न आलेले काैशल्य विकास संकुल ३ वर्षांत उभे करू, अशी घाेषणाही त्यांनी केली. मसीआतर्फे औरंगाबादेत आयाेजित 'अॅडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो-२०२०'च्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री बाेलत हाेते.
रडत बसायचे नाही; झेप घ्या
उद्योगांना लागणारे कुशल मनुष्यबळ मिळत नसल्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळत नाही. त्यामुळे शेंद्रा येथे आता 'कौशल्य विकास संकुल' उभारण्यात येईल. या संकुलात 'इंडस्ट्री- अकॅडमिया'मध्ये समन्वय ठेवून कुशल मनुष्यबळ निर्माण होईल, अशी घाेषणाही ठाकरेंनी केली. उद्योजकांकडे पाहत मुख्यमंत्री म्हणाले, 'तुमच्यामध्ये झेप घेण्याची ताकद आहे. त्यामुुळे आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देऊ. तुम्ही मात्र माझ्या भूमिपुत्रांना नोकऱ्यांसाठी प्रोत्साहन द्या. देशात मंदी आहे म्हणून रडत बसायचे का..? रडणारे कधीही स्वत:ला सिद्ध करत नाहीत. महाराष्ट्राला रडण्याचा नव्हे, लढण्याचा इतिहास आहे. कृषी आणि उद्योग या दोन महत्त्वाच्या विभागांना सोबत जोडून आगामी काळात निश्चित असे काही रचनात्मक काम करू,' असेही ते म्हणाले.
आम्हाला शेतकरी चिंतामुक्त करायचा
मुख्यमंत्री म्हणाले, 'दोन वेळचा घास पिकवणारा सध्या अडचणीत आहे. म्हणून त्यांना कर्जमुक्त करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली. पण आम्हाला शेतकरी चिंतामुक्त करायचा आहे. त्यासाठी अन्नप्रक्रिया पार्कच्या माध्यमातून उद्याेगाची संधी मिळेल. जूनमध्ये भूमिपूजन झाल्यानंतर अटी- शर्ती दूर करून लगेच काम सुरू करा, असे निर्देश त्यांनी प्रधान सचिव भूषण गगराणी यांना दिले.
0 comments:
Post a Comment
Please add comment