अमेरिका इराण मध्ये युद्धाचे सावट

इराकची राजधानी बगदादमध्ये अमेरिकेने ड्रोनद्वारे केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इराणी लष्करातील परदेशात काम करणाऱ्या अल्-कुद्स दलाचा शक्तिशाली कमांडर जनरल कासीम सुलेमानी मारला गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शनिवारी रात्री उशिरा इराणने प्रतिहल्ला चढवत बगदादमधील अमेरिकी दुतावास व अमेरिकेच्या अन्य ठिकाणांवर क्षेपणास्त्र तसेच मोर्टार डागल्याने युद्धाचे ढग दाटू लागले असून इराणमधील ५२ प्रमुख ठिकाणांवर हल्ला करण्याची थेट धमकी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.
अमेरिकेच्या कोणत्याही ठिकाणावरचा हल्ला खपवून घेतला जाणार नाही. असा हल्ला करणाऱ्यांना हुडकून काढू आणि त्यांचा खात्मा करू. इराणने अमेरिकेला नुकसान पोहचवल्यास त्याला जशास तसे उत्तर दिले जाईल. इराणमधील ५२ ठिकाणे आमच्या निशाण्यावर असतील, असे ट्रम्प यांनी ठणकावले.
इराणने बगदादमधील अमेरिकी दूतावास आणि बलाद हवाईतळावर हल्ला केल्यानंतर ट्रम्प यांनी तातडीने त्यावर अमेरिकेची भूमिका स्पष्ट करत मोठ्या विध्वंसाचेच संकेत दिले आहेत. अमेरिकेच्या सैन्याने इराणमधील ५२ ठिकाणे निवडली आहेत. यातील बहुतांश ठिकाणे ही इराणसाठी महत्त्वाची आहेत किंवा तेथील सांस्कृतिक ठेवा आहेत. त्यामुळे इराणने वेळीच शहाणे व्हावे, नपेक्षा मोठ्या परिणामांना त्यांना सामोरे जावे लागेल. अमेरिकेच्या मालकीच्या कोणत्याही संपत्तीवर वा अमेरिकी नागरिकांवर हल्ला झाल्यास लगेचच तीव्र प्रतिहल्ला झेलण्याची तयारी आपण ठेवावी, असे ट्रम्प यांनी बजावले.


इराणी जनरल कासीम सुलेमानी आणि मुहांदिसच्या इराकमध्ये शनिवारी काढण्यात आलेल्या अंत्ययात्रेला हजारोंच्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती. या वेळी उपस्थितांनी 'अमेरिका मुर्दाबाद' अशा घोषणा दिल्या. इराकचे पंतप्रधान आदिल अब्दुल महदी हेदेखील अंत्ययात्रेला उपस्थित होते. दरम्यान, इराकमधील इराणसमर्थक 'हशेद अल-शाबी'च्या दलाच्या ताफ्यावर शनिवारी सकाळी पुन्हा हवाईहल्ला केला. सुलेमानी आणि मुहंदिस यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकमोर्चा काढण्यात आला होता. त्यावर अमेरिकेने हल्ले केले. अमेरिकेने याबाबत प्रतिक्रिया दिलेली नाही; मात्र हा हल्ला अमेरिकेने केला असल्याचे इराकच्या सरकारी वृत्तवाहिनेने म्हटले आहे.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment