'समोर पंतप्रधान असो, गृहमंत्री असो की गुंड असो, मी कुणाला घाबरत नाही. तुम्ही घाबरला नाहीत, तर तुमचं कुणी वाकडं करून शकत नाही', असे सांगताना, 'मी दाऊद इब्राहिमला पाहिले असून, त्यांच्याशी बोललोय, इतकेच नाही त्याला मी दमही दिला आहे', असा गौप्यस्फोट शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी एका जाहीर मुलाखतीत केला आहे. हिंमत असेल तर माझ्या अंगावर या असे सूचक उद्गारही त्यांनी मुलाखतीदरम्यान काढले.
आता अंडरवर्ल्ड राहिलेलं नाही. आता काहीच नाही. तेव्हाच्या काळातील अडरवर्ल्ड काय होतं हो आम्ही पाहिलेलं आहे. त्या काळात मुंबईचं अंडरवर्ल्ड हे शिकागोच्या अंडरवर्ल्डपेक्षा अधिक गंभीर होतं. त्या काळात गुंडाला भेटायला अख्खं मंत्रालय खाली येत असे. करीम लालाला भेटण्यासाठी इंदिरा गांधीही आल्या होत्या, असं सांगताना लोक मला एकेकाळी गुंड म्हणत असत. चांगलं आहे. गुंड म्हणजे चांगलं काम करणारा माणूस. ऐसा पुत्र व्हावा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा, असं म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांनी राऊत यांच्या वक्तव्याचं स्वागत केलं.
हे सरकार असं आहे की, या सरकारला कुणी खिचडी म्हणत नाहीत. या सरकारला लोक सरकार म्हणतात. शरद पवार यांनी पुलोदचं सरकार स्थापन केलं होते. पुलोदच्या त्या सरकारला लोक पुलोदची खिचडी म्हणायचे. तीन पक्षांचे सरकार असूनही लोक या सरकारला खिचडी म्हणत नाहीत. याचं कारण या सरकारचे नेतृत्व उद्धव ठाकरे करतायत आणि त्यांच्या पाठिशी शरद पवार आहेत, असे राऊत म्हणाले. माझा शरद पवारांवर प्रचंड विश्वास असल्याचेही राऊत म्हणाले.
नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले याचा आम्हाला अभिमानच होता. मात्र, पुढे सगळं बदलत गेलं. नंतर चक्रं फिरली. 'माझं ते माझं. तुझं ते माझ्या बापाचं' हा राजकारणातील एक स्वभाव आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाला टोला हाणला. पुण्यात आयोजित लोकमत पुरस्कार वितरण सोहळ्यात विशेष मुलाखतीच्या कार्यक्रमात राऊत बोलत होते.
0 comments:
Post a Comment
Please add comment