संजय राऊत यांनी छत्रपतींच्या गादीचा अवमान केल्याच्या निषेधार्थ सातारा बंद

 संजय राऊत यांनी छत्रपतींच्या गादीचा अवमान केल्याच्या निषेधार्थ सातारा  बंद 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी एका कार्यक्रमात छत्रपतींच्या वारसांनी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे सादर करावेत, अशी टीका केली होती. राऊत यांच्या या वक्तव्यावरून संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. उदयनराजे भोसले समर्थकांनी तर राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून सातारा बंद पुकारले असून सकाळपासूनच साताऱ्यातील व्यवहार ठप्प झाले आहेत. साताऱ्यातील मुख्य बाजारपेठाही बंद झाल्या असून वाहतूक व्यवस्थाही तुरळक प्रमाणात सुरू आहेत. बसस्टँड परिसरातही दुकाने बंद असल्याने या परिसरात शुकशुकाट निर्माण झाला आहे. दरम्यान, बंद शांततेत सुरू असून अद्याप कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. काही वेळातच राजवाड्यातील गांधी मैदान ते साताऱ्यातील पोवई नाका असा मोर्चाही काढण्यात येणार असून पोवई नाका येथे सर्व आंदोलक जमणार आहेत. या मोर्चात भाजपसह साताऱ्यातील जनता मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. या मोर्चात उदयनराजे भोसलेही सहभागी होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. त्यामुळे उदयनराजे राऊतांना काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.


शिवसेना नेते संजय राऊत यांनी छत्रपतींच्या गादीचा अवमान केल्याच्या निषेधार्थ भाजप नेते उदयनराजे भोसले समर्थक आणि भाजपने आज सातारा बंद पुकारला आहे. तर सोलापूर, सांगली आणि नगरमध्ये राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन करण्यात आले आहे.
दरम्यान, साताऱ्यात बंद पुकारलेला असतानाच मंगळवेढा आणि संगमनेर येथेही आंदोलकांनी राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केलं. यावेळी 'जय शिवाजी, जय भवानी'च्या घोषणाही देण्यात आल्या. त्यामुळे राऊत यांच्या वक्तव्यामुळे साताऱ्यासह सोलापूर, नगर आणि सांगलीतील वातावरण ढवळून निघालं आहे. 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' या पुस्तकावर टीका करताना राऊत यांनी यावर छत्रपतींच्या वंशजांनीच बोलावे अशी टीका केली होती. त्यावर उदयनराजे यांनी शिवसेनेचं नाव ठेवताना छत्रपतींच्या वंशजांना विचारले होते का? असा सवाल केला होता. उदयनराजे यांच्या या वक्तव्याचा समाचार घेताना राऊत यांनी छत्रपतींच्या वंशजांकडेच ते वंशज असल्याचे पुरावे मागितले होते, त्यामुळे उदयनराजे समर्थक आणि भाजप आक्रमक झाली असून याप्रकरणावरून त्यांनी राऊत यांना घेरले आहे.

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment