रजनीकांत विरोधी तामिळनाडूमध्ये पेटला वाद

रजनीकांत विरोधी तामिळनाडूमध्ये पेटला  वाद

'तुघलक' या तामिळ मासिकाच्या 50 व्या वर्षपूर्तीनिमित्ताने 14 जानेवारी रोजी आयोजित एका कार्यक्रमात रजनीकांत यांनी भाषण केलं होतं. या कार्यक्रमाला भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एस. गुरुमूर्ती, 'तुघलक' मासिकाचे संपादक आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

द्रविडी चळवळीचे जनक ई. व्ही. रामास्वामी पेरियार यांच्याविषयी सुपरस्टार रजनीकांत यांनी सार्वजनिकरित्या केलेल्या एका वक्तव्यावरून तामिळनाडूत सध्या राजकीय वादळ उठलं आहे.
तामिळनाडूमध्ये पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक होणार आहे आणि 2021 ची निवडणूक लढवण्यासाठी आपण स्वतःचा पक्ष काढणार असल्याचं रजनीकांत यांनी 2017 सालीच जाहीर केलं होतं.
आपल्या भाषणात काय म्हणाले रजनीकांत?

आपल्या भाषणात रजनीकांत यांनी म्हटलं होतं, "तामिळनाडुतील सालेममध्ये आयोजित केलेल्या एका रॅलीत पेरियार यांनी श्री रामचंद्र आणि सीता यांच्या चपलांचा हार घेतलेल्या नग्न मूर्ती फिरवल्या होत्या. ही बातमी कुणीही छापली नाही. मात्र, चो. रामास्वामी ('तुघलक' मासिकाचे संस्थापक आणि माजी संपादक) यांनी ही बातमी कव्हर पेजवर छापली होती."
"यावरून DMKची बरीच बदनामी झाली. त्यामुळे त्यांनी या मासिकाचे बरेच अंक जप्त केले. मात्र, 'तुघलक'ने तो अंक पुन्हा छापला. तो अंक ब्लॅकमध्ये विकला गेला होता. 'आणि अशा प्रकारे करुणानिधी यांनी तुघलकची प्रसिद्धी केली' असं मासिकाच्या पुढच्याच अंकात चो रामास्वामी यांनी कव्हर पेजवर छापलं होतं. यानंतर चो देशभरात लोकप्रिय झाले."
रजनीकांत यांचं हे भाषण व्हायरल झाल्यानंतर द्रवीड कळघम आणि इतर पेरियार समर्थक संघटनांनी रजनीकांत यांच्याविरोधात निदर्शनं सुरू केली. रजनीकांत यांनी धार्मिक भावना भडकावून सामाजिक अशांतता पसरवल्याचा आरोप करत तंतई पेरियार द्रविडर कळघम या संघटनेने त्यांच्याविरोधात पोलीस तक्रारही दाखल केली.

मी माफी मागणार नाही'

द्रविड कळघम बुधवारी (22 जानेवारी) रजनीकांत यांच्या चेन्नईमधल्या घराबाहेर निदर्शनं करण्यार होती. निदर्शनांपूर्वीच रजनीकांत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण पेरियार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावर माफी मागणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली.

'मी त्या रॅलीचा भाग होतो'

1971 साली पेरियार यांनी ती रॅली काढली होती. तत्कालीन द्रमुक सरकारने हिंदुत्ववादी संघटना असलेल्या जनसंघाला पेरियार आणि त्यांच्या रॅलीला विरोध करण्याची परवानगी दिली होती.
पेरियार यांच्या रॅलीमध्ये द्रविड कळघमचे सरचिटणीस कली पुंगुंद्रन हेदेखील सहभागी होते. बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "रजनीकांत त्या घटनेचं वास्तव मोडून-तोडून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. 24 जानेवारी 1971 रोजी अंधश्रद्धेविरोधात एक मोठी रॅली काढण्यात आली होती. त्याकाळचे सुप्रसिद्ध आणि लोकप्रिय संशोधक जी. डी. नायडू यांनी या रॅलीचं उद्घाटन केलं होतं. या रॅलीत पेरियार एका ट्रकमध्ये होते."
"दरम्यान, जनसंघाच्या लोकांना या रॅलीला 'काळे झेंडे' दाखवण्याची परवानगी मिळाली होती. पेरियार यांची गाडी गेली तेव्हा जनसंघाच्या एका कार्यकर्त्याने त्यांच्यावर चप्पल भिरकावली. पण ती त्यांना लागली नाही. चप्पलचा नेम चुकला आणि पेरियार ज्या ट्रकमध्ये बसले होते त्या ट्रकच्या मागच्या बाजूला ती लागली. यामुळे द्रवीडर कळघमचे कार्यकर्ते संतापले. त्यांनी एका ट्रकमध्ये ठेवलेल्या रामाच्या फोटोला मारायला सुरुवात केली."


पेरियार यांच्या विचारधारेवर आधारित द्रविडर इयाक्का तमिळ पेरावई नावाची एक संघटना तामिळनाडूत आहे. या संघटनेचे संस्थापक सुबा वीरापंडियन म्हणतात, "1971 साली चो रामास्वामी यांच्या प्रपोगांड्याला अनेक जण बळी पडले आणि द्रमुक विरोधात अनेक निदर्शनं झालं. लोकांनी पेरियार यांचे पुतळे आणि फोटो जाळले. त्यावेळी पेरियार यांनी एक लेख लिहिला होता."
"त्या लेखाचं शीर्षक होतं, 'कॉमरेड्स शांत रहा (Stay Calm Comrades)'. या लेखात त्यांनी लिहिलं होतं, की ही निदर्शनं रामाच्या बाजूने किंवा पेरियार यांच्या विरोधात नाहीत. द्रमुक आगामी विधानसभा निवडणूक जिंकू नये, यासाठी ही निदर्शनं घडवली जात आहेत. त्यांनी मला जाळलं तरी काळजी करू नका. हे डावपेच आपल्यासाठी नवीन नाहीत. द्रविडी जनता आणि द्रविडी विचारसरणीसाठी पेरियार हा सर्व अपमान गिळायला तयार होते. चो किंवा रजनीकांत यांना हे कधीच कळणार नाही."
तामिळनाडुतील VCK पक्षाचे नेते आणि लोकसभा खासदार तोल तिरुमावलावन यांनी म्हटलं, "पेरियार यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल रजनीकांत यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे. संघ परिवाराच्या अजेंड्यासाठी रजनीने बळीचा बकरा बनू नये."

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment