परळी केंद्रातील वीज महाग



राज्यातील इतर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातून तयार होणाऱ्या विजेपेक्षा परळी औष्णिक विद्युत केंद्रात निर्मित वीज महाग असल्याने महावितरणकडून वीज खरेदीस नकार दिल्याने २२ ऑगस्ट २०१९ पासून सुरू असलेले परळीचे औष्णिक वीज निर्मिती केंद्रात सुरू असलेले तीन संच रविवारपासून बंद करावे लागले. संच क्र. ६, ७ व ८ मधून तयार होणारी ६७४ मेगावॅट वीज निर्मिती यामुळे ठप्प झाली आहे.
कोळसा, पाणी व मनुष्यबळ मुबलक उपलब्ध असताना महावितरणकडून मागणी नसल्याने जानेवारी २०१९ पासून परळीच्या वीज निर्मिती केंद्रातून वीज निर्मिती ठप्प झाली होती. ती पुन्हा २२ ऑगस्ट रोजी सुरू झाली. मागील तीन महिन्यात संच क्र. ६,७ व ८ मधून पूर्ण क्षमतेने वीज निर्मिती सुरू होती. परंतु महावितरणकडून अचानक वीज खरेदी बंद झाल्याने आज १२ जानेवारीच्या पहाटे १२ पासून तिन्ही संचांतून वीज निर्मिती बंद करावी लागल्याने परळीचे वीज निर्मिती केंद्र पुन्हा बंद पडले आहे.
महाराष्ट्रात नाशिक, कोराडी, चंद्रपूर, भुसावळ या ठिकाणी औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे आहेत. यातील नाशिक वगळता सर्व वीज केंद्रे दगडी कोळशाच्या खाणी असलेल्या प्रदेशाजवळ आहेत. परळीतील वीज निर्मिती केंद्रासाठी चंद्रपूर व आंध्र प्रदेशातून कोळसा मागवला जातो. सध्या परळी केंद्राला दररोज तीन हजार मेट्रिक टन कोळशाची आवश्यकता आहे. या कोळशातही तीन प्रकार असून उच्च, मध्यम व कनिष्ठ दर्जाचा कोळसा महानिर्मिती खरेदी करते. परळी केंद्रासाठी चंद्रपूर येथून 'वेकोलि' व आंध्र प्रदेशातून 'पीपीएस' या कंपन्यांकडून कोळसा खरेदी केला जातो. रेल्वे वॅगनद्वारे ताे परळीकडे आणला जातो. परळीसाठी कोळशाची वाहतूक ५०० कि.मी.वरून हाेत असल्याने या वाहतुकीचा खर्च इतर वीज केंद्राच्या तुलनेने दुप्पट असल्याने परळीची वीज घेण्यास महावितरण इतर पर्याय ठेवत असते. विजेची मागणी वाढल्यानंतरच परळीची वीज खरेदी केली जाते.
परळी वीज केंद्र वाचवण्याचे आव्हान
परळीतील एकूण आठ पैकी तीनच संच कार्यरत आहेत. संच क्र. १, २, ३, ४, ५ हे कायमचे बंद केले आहेत।  सध्या संच क्र. ६ , ७ व ८ कार्यरत आहेत. यामुळे एकूण १ हजार १७० मेगावॅट वीज निर्मितीची क्षमता असलेल्या परळी केंद्राची सध्याची क्षमता ७५० मे. वॅ. झाली आहे. हे तिन्ही संच अधून मधून सुरू असतात. यामुळे परळी केंद्र राखीव खेळाडूसारखे बनले असून गरज पडेल तेव्हा सुरू व बंद करण्यात येत असल्याने हे वीज केंद्र वाचवण्याचे आव्हान जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यापुढे आहे.
पाणी व कोळशाचा मुबलक साठा
परळी केंद्रासाठी दररोज तीन हजार मेट्रिक टन कोळसा लागतो. सध्या वीज केंद्रात दोन लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक कोळसा व खडका येथील बंधाऱ्यात वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा असताना परळी केंद्र पुन्हा बंद पडले आहे.





About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment