‘विश्वासू’ सरकारला पंकजा मुंडेंचे साकडे

‘विश्वासू’ सरकारला पंकजा मुंडेंचे साकडे

गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून मराठवाड्याच्या पाणीप्रश्नावर सोमवारी औरंगाबादेत उपोषण पंकजा मुंडेंनी केले. देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर टीका करत मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला. उपोषणकर्त्या पंकजा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे काैतुक केले. हे सरकार आमच्यापेक्षाही चांगले काम करेल, असा विश्वासही व्यक्त केला.
‘या सरकारचे अजून शंभर दिवसही पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे त्यांच्यावर टीका केल्यास तो पोटशूळ असल्याचा संदेश जाईल. म्हणूनच मी त्यांच्यावर टीका करणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे संवेदनशील आहेत, ते मराठवाड्याचा पाणीप्रश्न नक्कीच सोडवतील. उपोषणाच्या माध्यमातून आमच्या मागण्यांकडे त्यांचे मी फक्त लक्ष वेधत आहे. आमच्या सरकारने मराठवाड्यात कॅबिनेट बैठक घेऊन येथील अनेक प्रश्न मार्गी लावले होते, तशीच बैठक मुख्यमंत्र्यांनी घेऊन पाणीप्रश्न मार्गी लावावा, जेणेकरून माझा शेतकरी सुखी होईल,’ अशी अपेक्षा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली.
विभागीय आयुक्त कार्यालयासमोरील दिल्ली गेट परिसरात त्यांनी ११ ते ४.३० या वेळेत लाक्षणिक उपोषण केले. सकाळी १०.५५ वाजता पंकजा यांचे उपोषणस्थळी आगमन झाले. त्यांच्यापाठोपाठ केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार अतुल सावे, शिरीष बोराळकर यांचेही आगमन झाले. त्या ठिकाणी फडणवीस व इतर नेत्यांची भाषणे झाली. विशेष म्हणजे व्यासपीठावरील फलकावर गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान व भाजप अशी दोन्ही नावे ठळकपणे लिहिलेली हेाती.
सायंकाळी ४.३० वाजता पंकजा यांनी एका छोट्या मुलीच्या हातून सरबत घेऊन उपोषण सोडले. तत्पूर्वी भाषणात पंकजा म्हणाल्या, ‘माझ्याकडे सध्या कोणतेही पद नाही, तरीही इथल्या शेतकऱ्यांविषयी मला तळमळ आहे. मी एक समाजसेविका म्हणून आता काम करत आहे. आपले उपोषण अपेक्षांचे असून उपेक्षांचे नाही. पक्षाचे जोडे बाजूला ठेवून उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन आपण केले होते. परंतु नंतर अनेकांनी आपल्या उपोषणावर टीकाटिप्पणी सुरू केली. माझ्या पक्षाचे वरिष्ठ नेते, अनेक कार्यकर्ते या उपोषणात सहभागी झाले त्यांचे मी आभार मानते. काही लोक म्हणतात तुम्ही सत्तेत असताना काय केले, मग आता उपोषण कशासाठी? मात्र मी आता टीका करणाऱ्यांकडे लक्ष देत नाही. कुणाचाही रागलोभ धरत नाही. आम्ही सरकारमध्ये असताना निश्चित खूप कामे केली. पुन्हा सरकार आले असते तर ती कामे पुढे नेलीच असती. मात्र आता आमचे सरकार नाही. त्यामुळे ही कामे या सरकारने पुढे न्यावीत यासाठी हे उपोषण आहे. आम्ही जर कामेच केली नसती तर आज मला लोकांनी इथे बसूच दिले नसते.
कुणी माझ्यावर टीका केली तरी राग मानून घेऊ नका- मुंडे
राज्यात प्रथमच तीन पक्षांचे सरकार आहे. ठाकरे घराण्यातील व्यक्ती पहिल्यांदाच मुख्यमंत्री बनली असून त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. कार्यकर्त्यांनी परळीच्या पराभवाचे फार काळ विश्लेषण करत बसू नये. गोपीनाथ मुंडे यांचे निधन हीच आपल्यासाठी सर्वात धक्कादायक घटना आहे, त्यापेक्षा आणखी काय वाईट होऊ शकते? मंत्रालयातील कक्षाबाहेरची पाटी माझ्यासाठी महत्त्वाची नाही, तर कार्यकर्ते हीच माझी संपत्ती आहे. कुणी माझ्यावर टीका केली तरी राग मानून घेऊ नका. लोक प्रसिद्धीसाठी असे उपद्व्याप करीत असतात. पंकजा मुंडे केवळ बीड जिल्ह्यापुरती मर्यादित नसून मी राज्याची आहे, असा दावाही पंकजांनी केला.
पाणी योजना थांबवाल तर रस्त्यावर उतरून आंदोलन : देवेंद्र फडणवीस


‘मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी आम्ही काम केले. मात्र हे सरकार पाण्याच्या योजनांनाच स्थगिती देत आहे. सध्या उपोषणाच्या माध्यमातून या प्रश्नाकडे आम्ही सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र सरकारची हीच भूमिका कायम राहिली तर रस्त्यावर उतरून लढा दिला जाईल,’ असा इशारा माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिला. आपल्या १४ मिनिटांच्या भाषणात फडणवीस यांनी कृष्णा खोरे, जलयुक्त शिवार, मराठवाडा वॉटरग्रीड, पश्चिमवाहिनी नद्यांतून पाणी वळवणे आणि गोदावरी खोऱ्यात २५ टीएमसी पाणी आणणे, औरंगाबादची नवीन पाणीपुरवठा योजना आदी मराठवाड्याशी संबंधित पाणी प्रश्नांवर आक्रमक भूमिका मांडली. मात्र पंकजांच्या उपोषणात सहभागी झालेले फडणवीस उपोषणासाठी एक मिनिटही व्यासपीठावर बसले नाहीत. उभ्या उभ्या भाषण करून ते नांदेडला निघून गेले.


फडणवीस म्हणाले, ‘अगोदरच्या आघाडी सरकारने मराठवाड्यावर अन्यायच केला होता. मराठवाड्याचे २१ टीएमसी पाणी दिले नाही. आमच्या सरकारने मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाठपुरावा करून आम्ही कृष्णा खोऱ्याच्या कामासाठी ४ हजार कोटी मंजूर करून घेतले. त्या माध्यमातून बोगद्याचे काम सुरू झाले आहे. हे पाणी उस्मानाबाद, बीड व लातूर जिल्ह्याला मिळेल. मात्र आताचे सरकार हेउर्वरित. काम थांबवणार असल्याची भीती आहे. म्हणून पंकजा उपोषणासाठी बसल्या आहेत. आमच्या हक्काचे पाणी अडवले तर रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा त्यांनी दिला.
लोकांच्या मनातली योजना बंद करू नका : फडणवीस म्हणाले की, ‘जलयुक्त शिवार योजना सरकार बंद करत आहे. या सरकारने हवे तर क्रेडिट घ्यावे, योजनेचे नावही बदलावे, पण योजना बंद करून मराठवाड्याचे नुकसान करू नये. कारण ही योजना जनतेच्या मनातली आहे. गोदावरी खोऱ्यातून मराठवाड्याला १०२ टीएमसी पाणी मिळणार होते. मात्र २००७ मध्ये आघाडी सरकारने नवीन धरणे बाधण्यासाठी बंधने घातली. त्यामुळे १०२ टीएमसी पाणी कागदावरच आहे. याबाबत आम्ही हायकोर्टात गेलो होतो. आता मराठवाड्याचे वाहून जाणारे २५ टीएमसी पाणी अडवण्यासाठी नव्याने धरणे झाली पाहिजेत. आमच्या सरकारने याबाबत सर्व तयारी करून ठेवली आहे. या सरकारला केवळ अंतिम मान्यता द्यायची आहे.
वॉटरग्रीडला स्थगिती अहिताची : फडणवीस म्हणाले, ‘वॉटरग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यातली सर्व धरणे जोडण्याात येणार आहेत. पण सरकारने या निविदांनाच स्थगिती दिली आहे. औरंगाबादसाठी पाणी योजनेसाठी आम्ही १६०० कोटी दिले आहेत. मात्र केवळ टेंडर अॅडजस्टमेंटचेच काम सध्या चालले आहे. तुम्ही कोणालाही कामे द्या, मात्र योजना सुरू करा,’ असा टोला त्यांनी औरंगाबाद मनपातील सत्ताधारी शिवसेनेला लगावला.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment