![]() |
खेलो इंडिया |
'खेलो इंडिया' स्पर्धेसाठी प्रथमच महाराष्ट्राच्या संपूर्ण संघाला विमानाने पाठविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. त्यामुळे एरवी रेल्वेने चार दिवसांचा प्रवास करून गुवाहाटीला जाण्यापेक्षा खेळाडूंचा प्रवास आरामदायक झाला. पण योग्य कागदपत्रे नसल्याचे कारण देत स्पाइसजेटने भक्ती आणि अभिषेक यांना बंदुका नेण्यास मनाई केली. भक्तीचे वडील आता रेल्वेने .२२ची रायफल गुवाहाटीला घेऊन जाणार आहेत. तिची लढत १७-१८ जानेवारीला आहे. तर अभिषेकची लढत १४-१५ जानेवारीला होणार आहे.
'खेलो इंडिया' या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा नेमबाजी संघ गुवाहाटीला रवाना झाला खरा, पण या संघातील दोन नेमबाजांना आपल्या बंदुका मात्र विमान सुरक्षाव्यवस्थेच्या अडेलतट्टूपणामुळे मुंबईतच सोडून जावे लागले. महाराष्ट्राच्या २१ नेमबाजांचा संघ गुरुवारी दुपारी १२.३५च्या स्पाइसजेट विमानाने रवाना झाला. पण त्याआधी, बंदुका नेण्यासंदर्भातील नियमांच्या गोंधळामुळे ५० मी. थ्री पोझिशनमधील आंतरराष्ट्रीय नेमबाज भक्ती खामकर आणि मिश्र ट्रॅप नेमबाजीतील अभिषेक पाटील यांना आपल्या बंदुका गुवाहाटीला नेता आल्या नाहीत.
भक्ती आणि अभिषेक यांच्या अनुक्रमे आई आणि बहिणीच्या नावावर या बंदुकांचा परवाना आहे. पण त्यांनी गुवाहाटीला जाण्याआधी त्यासंदर्भातील अधिकारपत्र घेतले होते. त्या आधारावर त्यांना प्रवास करण्याची परवानगी नियमानुसार देता आली असती असे सूत्रांचे म्हणणे आहे. असे अधिकारपत्र घेऊन खेळाडू नियमितपणे विविध स्पर्धांत सहभागी होत असतात. शिवाय, खेळाडूंच्या सगळ्या सामानावर टॅगही होते आणि त्यांना बोर्डिंग पासही देण्यात आले होते. मात्र या दोन खेळाडूंच्या बंदुका नेण्याची परवानगी देण्यात आली नाही. त्यावेळी नेमबाजी संघाकडून मग महाराष्ट्राच्या क्रीडा आयुक्तांनाही कळविण्यात आले आणि त्यांनीही यासंदर्भात हस्तक्षेप केला. मात्र नंतर स्पाइसजेटच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून या दोन खेळाडूंच्या बंदुकांना परवानगी नाकारण्यात आली.
0 comments:
Post a Comment
Please add comment