उद्या भारत बंदमुंबई : विविध कामगार संघटनांनी बुधवारी ८ जानेवारी रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. केंद्र सरकारचे कामगार विरोधी धोरण आणि विविध क्षेत्रातील कामगारांच्या मागण्यांसाठी उद्या भारत बंद पुकारण्यात आला आहे. या बंदमध्ये प्रमुख कामगार संघटनांबरोबरच सहा बँक संघटना सहभागी होणार आहेत. यामुळे बँकिंग सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. मात्र संपाने बँक शाखा ठप्प झाल्या तरी इतर पर्यायातून बँकिंग कामे उरकता येऊ शकतात.

भारत बंदमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्मचारी, सहकारी बँक, ग्रामीण बँक आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) यामधील कर्मचारी सहभागी होणार आहेत. आॅल इंडिया बँक्स असोसिएशनच्या माहितीनुसार सहा बँक युनियन्स उद्याच्या भारत बंदमध्ये सहभागी होत असून यामुळे बँकिंग सेवेवर परिणाम होईल. बँक शाखा आणि एटीम सेवेला भारत बंदचा फटका बसण्याची शक्यता आहे. दरम्यान एक दोन अपवाद वगळल्यास खासगी बँकांचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरु राहील.

भारत बंदचा फारसा परिणाम होणार नाही, असे 'एसबीआय'ने म्हटलं आहे. भारत बंदमध्ये सहभागी होणाऱ्या बँक कर्मचारी संघटनांमध्ये 'एसबीआय'च्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे बँकेच्या सेवेवर परिणाम होणार नाही, असा दावा 'एसबीआय'ने केला आहे.

बंद काळात तुम्ही 'या' पर्यायांनी बँक व्यवहार करू शकता
१. नेट बँकिंग


- आज जवळपास सर्वच बँकांकडून ग्राहकांना नेट बँकिंग सुविधा दिली जाते. यामुळे ग्राहकाला घर बसल्या बँकिंग व्यवहार करता येणे शक्य आहे.

२. डेबिट/क्रेडिट कार्ड- ई-कॉमर्स बाजारपेठेच्या विस्ताराने घरबसल्या खरेदी करणे सोपं झालं आहे. जवळपास सर्वच कंपन्या ग्राहकांना कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय देतात. डेबिट किंवा क्रेडिट कार्डने ऑनलाईन खरेदी करता येईल. खाद्यपदार्थही ऑनलाईन ऑर्डर करता येऊ शकतात. ज्याचे पेमेंट कार्डने किंवा ऍपने करता येईल.

३. एटीएम
- सर्वसाधारणपणे संप करण्यापूर्वी बँकांकडून एटीएममध्ये पुरेशा प्रमाणात रोकड उपलब्ध केली जाते. त्याशिवाय बहुतांश एटीएम ही बँकिंग सेवेची केंद्र बनली आहेत. ज्यात तुम्हाला चेक जमा करणे, चेकबुक रिक्वेस्ट टाकणे, पैसे काढणे, जमा करणे तसेच हस्तांतर करणे यासारखी महत्वाची कामे करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

४. ई-वॉलेट्स
- कॅशलेस इकाॅनॉमीतले सर्वात सोयिस्कर माध्यम म्हणून ई-वॉलेट्स ग्राहकांमध्ये लोकप्रिय बनली आहेत. छोट्या रकमेचे व्यवहार करण्यासाठी ई-वॉलेट्सचा मोठ्या संख्येने वापर केला जात आहे.

५. डिजिटल पेमेंट्सचा पर्याय
- जर तुम्हाला वीज देयके किंवा इतर देणी चुकती करायची असल्यास तुम्ही डिजिटल पेमेंट्सचा पर्याय स्वीकारू शकता. रांगेत वेळ दवडण्यापेक्षा ऑनलाईन पेमेंट करून तुम्ही वेळ वाचवू शकता.

६. 'एनईएफटी' (NEFT)/ 'आरटीजीएस' (RTGS)- नॅशनल इलेक्ट्राॅनिक फंड ट्रान्सफर सेवेमुळे (एनईएफटी) देशभरात एका बँकेतून दुसऱ्या बँकेत निधी हस्तांतरण करणे सुलभ व लवकर होते. 'एनईएफटी'मध्ये देशातील कोणत्याही बँकेच्या शाखेत खाते असलेल्या व्यक्तीला कोणत्याही बँकेच्या शाखेतून इलेक्ट्रॉनिक साधनांच्या माध्यमातून पैसे हस्तांतरित करता येतात. १ जानेवारीपासून 'एनईएफटी' निशुल्क झाले आहे. त्याचबरोबर 'आरटीजीएस'च्या माध्यमातून ग्राहक पैसे हस्तांतर करू शकतो. यासाठी ग्राहकाकडे आॅनलाइल बँकिंग सेवा असल्यास तो कुठूनही NEFT आणि RTGS चे व्यवहार करु शकतो.

७. IMPS (आयएमपीएस)- इमिजिएट पेमेंट सर्व्हिस अर्थात 'आयएमपीएस' ही २४ तास चालणारी ऑनलाईन सेवा आहे. यासाठी तुम्हाला बँकेच्या मोबाईल बँकिंग सेवेत नोंदणी करावी लागेल. 'आयएमपीएस'मधून तुम्ही दोन लाखांपर्यंत पैसे ट्रान्सफर करू शकता.
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment