जिल्हा परिषद सभागृहात पीठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक झाली. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद पोहरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत माळी उपस्थित होते.
जिल्हा परिषद सभागृहात बैठकीसाठी शिवसेनेचे पंधरा, राष्ट्रवादीेचे बारा, काँग्रेसचे दहा, भाजपचे अकरा तर तीन अपक्ष उमेदवार उपस्थित होते. या वेळी महिला बालकल्याण सभापतिपदासाठी शिवसेनेच्या रूपाली पाटील गोरेगावकर, सिंधुताई झटे, काँग्रेसच्या सुमनबाई जाधव यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र झटे व जाधव यांनी अर्ज मागे घेतल्याने सभापतिपदी रूपाली पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड झाली. अपेक्षेप्रमाणे सदर पद शिवसेनेकडे कायम राहिले.
समाज कल्याण सभापतिपदासाठी काँग्रेसकडून डॉ. सतीश पाचपुते, शिवसेनेचे फकिरा मुंडे यांनी अर्ज दाखल केले होते. यावेळी झालेल्या मतदानामध्ये डॉ. पाचपुते यांना आठ तर मुंडे यांना ४३ मते मिळाली. काँग्रेसकडे असलेल्या सभापतिपदावर शिवसेनेने ताबा मिळवला. विशेष म्हणजे काँग्रेसचे दोन सदस्य फुटले तर इतर सदस्यांनी शिवसेनेच्या मुंडे यांना पाठींबा दिला.
शिक्षण व कृषी सभापती या इतर दोन पदांसाठी राष्ट्रवादीकडून यशोदा दराडे, रत्नमाला चव्हाण, काँग्रेसचे बाजीराव जुमडे, काँग्रेसचे कैलास साळुंके यांनी अर्ज दाखल केले. यामध्ये राष्ट्रवादीच्या चार सदस्यांनी व्हीप नाकारल्यामुळे यशोदा दराडे यांना आठ मते मिळाली. तर राष्ट्रवादीच्याच रत्नमाला चव्हाण यांना ३५ मते मिळाली. त्यांना भाजपसह इतर पक्षांच्या सदस्यांनी मतदान केले. तसेच कैलास साळुंके यांना १८ तर बाजीराव जुमडे यांना २४ मते मिळाली. त्यामुळे इतर सभापतिंमध्ये राष्ट्रवादीच्या रत्नमाला चव्हाण व काँग्रेसचे बाजीराव जुमडे विजयी झाले. काँग्रेसकडे असलेले समाज कल्याण सभापतिपद काँग्रेसच्या एका गटाच्या हट्टामुळे गमवावे लागले आहे. तर इतर सभापतिपदाच्या निवडीमध्ये कोण कोणाला मतदान करीत आहे याचा अंदाजच कोणाला बांधता आला नाही. त्यामुळे गोंधळात गोंधळ झाला. आता पक्षीय नेत्यांकडून कोणाची मते फुटली यांचा अंदाज घेतला जाऊ लागला आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment