![]() |
माघी गणेश जयंतीचे मुहूर्त, विधी आणि महत्त्व |
पौराणिक मान्यतानुसार माघ मासच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला गणपतीचा जन्म झाला. गणेशलहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, तो दिवस माघ शुद्ध चतुर्थी. भगवान महादेव आणि देवी पार्वतीचे पुत्र गणपती प्रथम पूजनीय मानले गेले आहेत. कोणत्याही शुभ कार्य सुरू करण्यापूर्वी गणपतीची आराधना केली जाते. या तिथीला गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते, असे मानले जाते. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यातील चतुर्थीलाही तेवढेच महत्त्व आहे. गणेश जयंतीला विनायक चतुर्थी असेही म्हटले जाते.
माघी गणेश मुहूर्त
या वर्षातील माघ शुक्ल चतुर्थी २८ जानेवारी, मंगळवारी सकाळी ८ वाजून २० मिनिटांपासून सुरू झाली असून, २९ जानेवारी, बुधवारी सकाळी १० वाजून ५० मिनिटांनी समाप्त होईल. म्हणजेच गणेश जयंती पूजा विधी सकाळी ८ वाजून २० मिनिटांपासून सुरू केले जाऊ शकतात.
माघी गणेश पूजा विधी
चौरंगावर गणपतीची मूर्ती स्थापित करून शुद्ध पाण्याने अभिषेक करावा. गणपतीसह महादेव, गौरी, नंदी, कार्तिकेयसह शिव कुटुंबाची पूजा विधिपूर्वक करावी. गणपतीला लाल फुले वाहावित. गणपती अथर्वशीषाचा पाठ करून नैवेद्य दाखवावा. गणेश जयंतीला चंद्र दर्शन निषिद्ध मानले गेले आहे. या रात्री चंद्र दर्शन केल्याने मानसिक विकार उत्पन्न होऊ शकतात, अशी धारणा आहे.
आपल्याकडे भाद्रपदातील गणेश चतुर्थी मोठ्या प्रमाणावर साजरी करण्याची परंपरा आहे. भाद्रपद चतुर्थीला गणपतीची पूजा केल्यानंतर उकडीच्या मोदकांचा नैवैद्य दाखविला जातो. तर, माघी गणेशोत्सवात गणपतीला तीळाच्या लाडवांचा नैवैद्य दाखविण्याची प्रथा आहे. माघी गणेश जयंती ही तीलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते. अग्निपुराणमध्ये मोक्ष प्राप्तीसाठी तीलकुंद चतुर्थी व्रताचे महत्त्व सांगण्यात आले आहे.
भाद्रपद चतुर्थीप्रमाणे माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती सार्वजनिक पद्धतीने साजरी करण्याची प्रथा अलीकडे सुरू झाली आहे. पूर्वी हा उत्सव केवळ मंदिरांपुरता मर्यादित होता. आता हा उत्सव सार्वजनिक गणेशोत्सवाच्या स्वरूपात साजरा होऊ लागला आहे. मोठ्या सार्वजनिक मिरवणुका नसल्या तरी उत्सवाचे स्वरूप अधिक व्यापक झाल्याचे दिसून येत आहे.
0 comments:
Post a Comment
Please add comment