शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या मोबाईल लिंकमध्ये घुसखोरी; ओपन करताच सुरू होतो कँडीक्रश गेम

शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या मोबाईल लिंकमध्ये घुसखोरी; ओपन करताच सुरू होतो कँडीक्रश गेम


महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या मोबाईल लिंकमध्ये घुसखोरी झाल्याचे निदर्शनास आले आहे. एसएमएसमध्ये आलेली लिंक ओपन होताच कँडीक्रश गेम होतो सुरू होत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या मोबाईल लिंकमध्ये घुसखोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही लिंक उघडल्यावर कँडीक्रश गेम सुरू होत असल्याचं निदर्शनास आलंय. किसान पोर्टलवरुन शेतकऱ्यांना पाठवलेल्या संदेशामध्ये ही लिंक देण्यात आली आहे. परिणामी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम वाढला आहे.

किसान पोर्टलवरुन प्रत्येक शेतकऱ्यांना एसएमएस पाठवण्यात येतो. यावरुन हवामान, पावसाचा अंदाज, शासनाकडून राबवण्यात येणाऱ्या शासनाच्या विविध योजना, पिकांवरील रोग, रोगांवर करण्यात येणाऱ्या उपायांवरील मार्गदर्शन, तापमान आदींची माहिती देण्यात येत असते. याच पोर्टलवरुन कर्जमाफीसंदर्भात एसएमएस पाठवण्यात आला होता. यामुळे शेतकऱ्यांना आपले नाव योजनेत आहे किंवा नाही, याची माहिती घेता येईल असे वाटत असताना घडतेय तिसरंच. ही लिंक उघडताच कँडीक्रश गेम सुरू होत असल्याचे निदर्शनास आले आहे. कर्जमुक्ती योजनेत दोन हजार कॉल्सची माहिती मिळविण्यासाठी शेतकऱ्यांच्या मोबाइलवर ती लिंक पाठविण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे.

महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 -

योजनेनुसार, 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 या कालावधीत अल्पमुदतीचे पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी लागू करण्यात आली आहे. या कर्जमुक्ती योजनेचे निकषही या शासन निर्णयात देण्यात आलेल्या आहेत. कर्जमुक्ती योजनेमध्ये ज्या अल्पमुदत पीक कर्ज खात्याची अथवा अल्पमुदत पीक कर्जाचे पुनर्गठन/फेर पुनर्गठन केलेल्या कर्ज खात्याची मुद्दल व व्याजासह थकबाकीची रक्कम दोन लाखापेक्षा जास्त असेल, अशी कर्जखाती कर्जमुक्तीच्या लाभास पात्र ठरणार नाहीत, असा निकष या शासन निर्णयात लावण्यात आला आहे.

हे पात्र नसणार 

राज्यातील आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री, आजी/माजी लोकसभा/राज्यसभा सदस्य, आजी/माजी विधानसभा/विधान परिषद सदस्य यांना कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार नाही. केंद्र व राज्य शासनाचे सर्व अधिकारी/कर्मचारी, राज्य सार्वजनिक उपक्रम, शेतीबाह्य उत्पन्नातून आयकर भरणाऱ्या व्यक्ती, कृषी उत्पन्न बाजार समिती, सहकारी साखर कारखाना, सहकारी सुतगिरणी, नागरी सहकारी बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका व सहकारी दूध संघाचे अधिकारी व पदाधिकारी यांना या कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार नाही.

About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment