शेतकऱ्यांच्या मुलांचे सरकारी नोकरीचे स्वप्न साकार

शेतकऱ्यांच्या मुलांचे सरकारी नोकरीचे स्वप्न साकार

खामगाव तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाल्यांचे शासकीय नोकरीचे स्वप्न साकार झाले आहे. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने सामाजिक उपक्रम म्हणून शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी सुरू केलेल्या ‘मनोबल’ अभ्यासिकेतून मार्गदर्शन घेतलेल्या तब्बल १९ शेतकऱ्यांच्या पाल्यांना विविध शासकीय विभागात चांगल्या पदांवर नियुक्ती मिळाली. अभ्यासिकेमुळे शेतकऱ्यांच्या पाल्यांचे मनोबल वाढवले असून, आज बळीराजाचे  शेकडो पाल्य स्पर्धात्मक परीक्षेचे धडे गिरवत आहेत.

काबाडकष्टाचे जीवन जगणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या पाल्याने उच्च शिक्षण घेऊन शासकीय नोकरीत अधिकारीपद  मिळवावे, असे वाटत असते. त्याच महत्त्वाकांक्षेने शेतकऱ्यांची मुले प्रयत्न देखील करतात. मात्र, ग्रामीण भागात विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेविषयी योग्य मार्गदर्शन मिळत नाही. अभ्यासासाठी शहरात जातो, म्हटले तर शिकवणी वर्गाचे शुल्क, निवास आदींवर भरमसाठ खर्च होतो. दैनंदिन उदरनिर्वाहासाठी संघर्ष करणाऱ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना हे परवडणारे नसते. त्यामुळे प्रतिभावान व हुशार असूनही शेतकऱ्यांच्या पाल्यांना संधी मिळत नाही. गावातच शेती व मजुरी करण्यात त्यांचे जीवन जाते. शेतकरी व त्यांच्या पाल्यांची हीच समस्या लक्षात घेऊन काँग्रेसचे नेते व माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनात खामगाव बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळाने शेतकऱ्यांच्या पाल्यांसाठी अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेतला. खामगाव बाजार समितीमध्ये शेतकरी वर्गाला केंद्रबिंदू मानून विविध उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून दिलीपकुमार सानंदा यांच्या संकल्पनेतून साधारणत: चार वर्षांपूर्वी ‘मनोबल’ अभ्यासिकेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली.

गेल्या चार वर्षांपासून शेतकऱ्यांची मुले याठिकाणी स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करीत आहेत. या चार वर्षांमध्ये शेतकऱ्यांच्या तब्बल १९ पाल्यांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागात महत्त्वपूर्ण पदांवर नियुक्ती मिळाली. रेल्वेमध्ये सर्वाधिक आठ पाल्यांना नोकरी मिळाली. लोकोपायलटसह वेगवेगळय़ा पदांवर हे शेतकरी पुत्र कार्यरत आहेत. यामध्ये एकाची दिवाणी न्यायाधीश पदावरही नियुक्ती झाली आहे. सध्या संचालक मंडळ बरखास्त असून, बाजार समितीवर प्रशासकाची नियुक्ती आहे. प्रशासक एम.ए. कृपलानी यांच्या कार्यकाळातही शेतकरी पाल्यांचे जीवन घडवणाऱ्या अभ्यासिकेला विशेष महत्त्व देण्यात येत आहे .

अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्मिती

शेतकऱ्यांच्या मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या अभ्यासिकेत विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेसाठी मार्गदर्शन करण्यात येते. स्पर्धात्मक परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांना हजारो पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली आहेत. प्रश्न पत्रिका, परीक्षेसाठी उपयुक्त इतर साहित्य देखील विद्यार्थ्यांना नियमित पुरवण्यात येते. इंटरनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे ज्ञान अद्ययावत राहण्यासाठी सुसज्ज संगणक कक्ष उभारण्यात आला आहे. अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्मिती अभ्यासिकेत करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी उपयुक्त विविध उपक्रम बाजार समितीमध्ये राबवण्यात आले. शेतकऱ्यांच्या पाल्यांनी उच्चशिक्षण घेऊन अधिकारी होण्याच्या दृष्टीने अभ्यासिका उपक्रमाला सुरुवात करण्यात आली होती. त्याचे फलित म्हणून आज अनेक पाल्यांना शासकीय नोकरी मिळाली.


About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment