४० लाखांचा खोकला ...पैशांसाठी इतरांच्या जीवाशी खेळणा-या 'कसाई ' डाॅक्टरांविरूध्द आवाज उठवायलाच हवा


४० लाखांचा खोकला

नुकताच संक्रांत झाली. संक्रांतीच्या शुभेच्छा पाठवताना भ्रष्ट डाॅक्टरांविरूध्द चिड व संताप व्यक्त करणारे SMS सोशल मिडियामधुन मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले.खरं तर डाॅक्टर हे देवाचेच दुसरे रूप समजले जाते. तरीही डाॅक्टरांची यथेच्छ टिंगल- टवाळी केली गेली. त्यापैकी सर्वाधिक पसरवला गेलेला SMS पुढील प्रमाणे होता.
" पुराणकाळामध्ये एक तिळ सात जणांनी वाटुन खाल्ला होता. तसंच आजच्या काळात, एक पेशंट सापडला रे सापडला की, १) डाॅक्टर २) कन्सलटन्ट ३) स्पेशालिस्ट ४) पॅथाॅलाॅजी लॅब ५)रेडीओलाॅजिस्ट ६) केमिस्ट ७) हाॅस्पिटल स्टाफ असे सर्वजण समान वाटुन खाताना दिसतात. म्हणूनच आरोग्याची काळजी घ्या आणि निरोगी रहा, नाहीतर तुमचा तिळ झालंच समजा."
या SMS कडे गांभीर्याने पाहिले तर तो मनाला भावतो आणि पटतोही. कारण ती वस्तुस्थिती आहे. आज काही ठराविक डाॅक्टरांनी या चांगल्या डाॅक्टरी पेशाचा बाजार मांडला आहे. पैशांसाठी काही डाॅक्टर वाट्टेल त्या थराला जाऊन लुटमार करत आहेत.रूग्णांच्या जीवाशी खेळतातच पण नातेवाईकांच्या भावनांशी खेळत आहेत.त्यामुळेच ' एक वेळ दरोडेखोरांनी लुटले तरी चालेल. पण डाॅक्टरांनी नको ' असे म्हणायची वेळ आली आहे. आज सर्वात जास्त संताप हा काही खाजगी हाॅस्पिटलच्या बाबतीमध्ये रोजच्या रोज व्यक्त होताना दिसतो आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर हा डाॅक्टरी पेशाच पूरताच बदनाम होईल म्हणून चांगल्या डाॅक्टरांनी वेळीच पुढाकार घेऊन या लुटारू डाॅक्टरांविरूध्द जनजागृती करायला हवी.अशा भ्रष्ट डाॅक्टरांचा पर्दापाश करून त्यांचे खरे रूप जनतेसमोर आणायला हवे.जनतेनेही अशा 'कसाई ' डाॅक्टरांविरूध्द आवाज उठवायला हवा.ज्यांची- ज्यांची फसवणुक झाली आहे त्यांनी-त्यांनी पुढे येऊन घडलेला प्रसंग पुराव्यांसह सर्वांसमोर ठेवायला हवा.तरच ही लुटमार थांबेल नाहीतर बरीच कुटुंब उध्वस्त होतील.अक्षरशः आयुष्यातून उठतील.
बुधवार दि.२२ जानेवारी रोजी वाडा शहरामध्ये एक दु:खद घटना घडली. अवघ्या २५ वर्षाचा निखील राजेंद्र थोरात याचे दु:खद निधन झाले. एक परिवार अक्षरशः उध्वस्त झाला.नेमकं काय घडलं याची माहिती घेतली तर धक्कादायक माहिती हाती लागली. दि.१४ डिसेंबर २०१९ रोजी निखिलला खोकला झाला म्हणून वाडा शहरातीलच एका दवाखान्यात नेले.तेथे त्याच्यावर उपचार करण्यात येत होते .दोन दिवसांनी डाॅक्टरांनी त्याला पुढे हलवायला सांगितले. म्हणुन नातेवाईकांनी त्याला दि.१८ डिसेंबर रोजी ठाणे शहरामधील नामांकित खाजगी हाॅस्पिटलमध्ये भरती केले. निखिल हा खोकल्याचा पेशंट होता.मात्र त्यांच्यावर विविध प्रकारच्या चाचण्या व तपासण्या सुरू केल्या गेल्या. त्यातच तो अस्वस्थ झाला. खोकला बरा होत नव्हता आणि त्याला नेमका कोणता आजार आहे वा हा आजार कुठल्या उपचाराने बरा होईल? हे डॉक्टर सांगु शकत नव्हते. अशा आजाराचे निदानच झालेले नव्हते तरीही एवढे मोठे नामांकित डॉक्टर त्याच्यावर उपचार कशाच्या आधारावर करत होते? हाही मोठा प्रश्न आहे. शेवटपर्यंत निदान माहीत झालेले नसताना व महागडे उपचार सुरू असतानाच निखिल सिरीयस झाला व त्याला तत्काळ दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलला हालवायला सांगितले. तोपर्यंत आठ लाख रुपये बिल घेऊन डॉक्टर मोकळे झाले होते.
निखिलला हॉस्पिटलला भरती केल्यानंतर तत्काळ अनामत रक्कम घेतली. त्यानंतर ३ लाख ५० हजाराचे कोटेशन देऊन पेशंट बरा होईल, असे सांगितले. प्रत्यक्षात ८ लाख रुपये बिल घेऊनही पेशंट बरा झाला नाही. उलट तो अधिकच अस्वस्थ झाला. त्याच स्थितीमध्ये त्याला तेथून हालवायला सांगितले. नातेवाईकांचा नाईलाज होता. जवळ पैसे नव्हते आणि पेशंट दुसऱ्या रुग्णालयामध्ये हलवायचा होता. २ लाख ९० हजार रुपये भरायचे होते. अशाही परिस्थितीमध्ये आधी पैसे भरा मगच पेशन्ट हलवा, असे त्या निर्दयी डॉक्टरांनी सांगितले. नातेवाईकांनी कसे तरी पैसे भरले आणि मुलुंड येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये पेशंटला दि.३१ डिसेंबर रोजी भरती केले. तेथे पेशंट भरती करतानाच २ लाख रूपये रोख घेतले. मगच उपचार सुरू केले. दोन दिवसांनी निखिलला व्हायरस निमोनिया झाल्याचे सांगितले. या आजारावर २२ जानेवारीपर्यंत उपचार सुरू राहिले अखेर शेवटच्या क्षणी डॉक्टरांनी निखिलच्या वडिलांना 'तुम्ही देवावर विश्वास ठेवा, आता देवच तुमच्या मुलाला वाचवू शकेल ' असे सांगितले, त्यावेळी वडील राजेंद्र थोरात यांच्या डोळ्यात पाणीच आले भरल्या डोळ्याने त्यांनी डॉक्टरांना सांगितले की,'आम्ही तुमच्यात देव पाहाणारे. तुम्हीच वाचवा माझ्या मुलाला ? त्यावर डॉक्टर 'आता आमच्या हातात काही राहिलेले नाही 'असे सांगून निघून गेले. थोड्याच वेळात निखिलच्या मृत्यूची बातमी बाहेर आली. दुःखाचा डोंगर कोसळला असतानाच तेथील कर्मचाऱ्यांनी,'आधी २ लाख ९१ हजार रुपये भरा आणि बॉडी घेऊन जा,' असे अत्यंत निर्दयीपणे सांगितले. दि.३१ डिसेंबर ते २२ जानेवारी पर्यंत २८ लाखांहून अधिक बिल भरलेल्या वडिलांना पुन्हा पैसे भरायला सांगून 'बॉडी' घेऊन जा असे सांगितल्यानंतर त्यांना काय वाटले असेल? पण हॉस्पिटलचा स्टाफ काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हता,शेवटी नातेवाईकांनी धावाधाव करून खासदार मनोज कोटक यांचे पत्र मिळवले तेव्हा ५० हजार रुपये घेऊन बॉडी ताब्यात दिली. निखिलचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. दि.१४ डिसेंबर रोजी झालेला साधा खोकला सुमारे ४० लाखांचे डॉक्टरांचे बिल भरून कायमचा बरा झाला होता. हसत- खेळत हॉस्पिटल मध्ये भरती झालेला निखिल हॉस्पिटल मधून 'बॉडी'म्हणून बाहेर आला होता. वयाच्या २५ व्या वर्षी झालेला त्याचा मृत्यू मनाला वेदना देऊन गेला त्यापेक्षाही वेदना झाल्या, संताप आला तो लुटारू डॉक्टरांचा.लाखो रुपये लुटूनही त्यांना निखिलला वाचवता आले नाही. शेवटी 'देवावर विश्वास ठेवा'म्हणणाऱ्या डॉक्टरांवर विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न पडतो. म्हणूनच आजच्या या लुटारू डॉक्टरांची चीड येते संताप वाटतो. मी निखिलच्या वडिलांना अर्थात राजेंद्र थोरात यांना विचारले की, तुमची परिस्थिती नसतानाही तुम्ही एवढे पैसे नातेवाईकांकडून उभे केलेत मग तुम्हाला कुठल्या धर्मदाय संस्थेने मदत केली नाही का? कारण रुग्णांना मदत करणाऱ्या अनेक समाजसेवी संस्था आहेत. त्यावर थोरात तत्काळ म्हणाले," सर्व संस्था या बोगस आहेत. आम्ही खूप प्रयत्न केले पण एकही संस्था मदतीला धावून आली नाही. या संस्था फक्त दिखाऊपणा करतात. आपल्या संस्थेची जाहिरात करून रुग्णांच्या नावावर श्रीमंतांकडून संस्थेला मदत मिळतात आणि स्वतःचेच खिसे भरतात. शासनाचे रुग्णांसाठीचे अनुदान, शासनाच्या रुग्णांसाठी असलेल्या योजना लुटण्यासाठीच या संस्था असतात. जेथून प्रसिद्धी आणि पैसा मिळेल तेथेच या संस्था धावतात. खऱ्या रुग्णांकडे ढुंकूनही पाहात नाही." त्यांचे हे बोलणे ऐकूण हैराणच झालो. सामाजिक संस्था याही लुटारू डॉक्टरांप्रमाणेच स्वतःचे खिसे भरण्यासाठीच समाजसेवेचा बुरखा पांघरून ढोंग करतात की काय? असा प्रश्न पडला. कारण निखिलला त्याच्या मित्रांनी खूप प्रयत्न करूनही कुठूनच मदत मिळाली नाही. आता जर सामाजिक संस्थाही मदत करणार नसतील आणि डॉक्टर रोजच्या रोज लाखो रुपये भरायला लावत असतील तर रुग्णांच्या नातेवाईकांनी नेमकं करायचं काय? गरिबांनी आजारी पडूच नये की काय? आजारी पडून महागड्या हॉस्पिटलमध्ये भरती होऊन लाखो रुपयांची बिले भरून कुटुंबाला उध्वस्त करण्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी असेच विचार आता गरीब रुग्णांच्या मनामध्ये यायला लागलेत. कारण रोज मोठ्या हॉस्पिटलमधून बाहेर येणारी प्रेतं बघितली की, या एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमधील डॉक्टर नेमके उपचार तरी काय करतात? आणि एवढी बिलं कशी करतात? असा प्रश्न पडतो. निखिल थोरात यांची ही एक अशी घटना नाही. अशा घटना रोज घडत असतात. काही हाताच्या बोटावर मोजता येतील एवढे डॉक्टर सोडले तर काही डॉक्टर ही अशी लूटमार रोजच करतात. लाखो रुपयांची बिलं रोज भरली जातात. जणू काही आजारी पडणे हा एक गुन्हाच झाला आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. छोट्या- छोट्या आजारांसाठी नको त्या नको त्या टेस्ट करायला लावल्या जातात कारण त्यामधून डॉक्टरांना ३० ते ३५ टक्के कमिशन ठरलेले असते. काही गरज नसताना भली मोठी औषधांची लिस्ट दिली जाते आणि ती औषधे ठराविक मेडिकल स्टोअर्स मधूनच घेण्याची सक्ती केली जाते. काही डॉक्टरांनी तर स्वतःचीच मेडिकल स्टोअर उघडली आहेत. बऱ्याच मेडिकल मधून डॉक्टरांना नियमित कमिशन अर्थात ' हप्ता ' मिळत असतो असे ' हप्तेखोर ' डॉक्टर पेशंटशी कसायासारखेच वागतात. गळ्यावरुन निर्दयीपणे सुरा फिरवतात व पैसा कमवतात. गरज नसताना नको त्या गोळ्या, औषधे घ्यायला लावतात. लॅब चालकांशीही यांचे कमिशनचे लागे-बांधे असतात. त्यामुळेच लघवी, थुंकी, शौच, रक्त गरज नसतानाही तपासायला सांगतात. पेशंटची आर्थिक परिस्थिती चांगली असली की, गरज नसताना एक्स-रे काढायला, सिटी स्कॅन, सोनोग्राफी करायला सांगतात. आता तर नैसर्गिकरित्या बाळंतपण होणेच बंद झाले आहे की काय? असा प्रश्न पडतो. ५० हजार रुपयांच्या खाली डिलिव्हरी होतच नाही. ही लूटमार रोज सर्वच लोकं उघड्या डोळ्यांनी पाहतात पण बोलणार कोण? सर्वांचेच हात बांधलेले आणि सर्वांनाच डॉक्टरांनी खिशात ठेवलेले. त्यातच ज्यांचा पेशंट रुग्णालयात असतो त्याला काळजी पेशंटची असते. तो डॉक्टरांच्या विरोधात काय बोलणार? आणि बोलून ऐकणार तरी कोण? आपण एखाद्या रुग्णाला स्पेशालिस्ट कडे नेतो म्हणजे काय करतो? तर त्या स्पेशालिस्टला आधीच सर्वकाही माहीत असतं की पेशंटला नेमकं काय झालंय? त्याला कोणता आजार आहे?त्याच्यावर कुठले उपचार करायला पाहिजेत? आणि पेशंट या आजारातून बरा होईल की नाही? तरीही हेच ' स्पेशालिस्ट ' केवळ बिल वाढवण्यासाठी अर्थात पैसे उकळण्यासाठीच नको त्या टेस्ट करत राहतात आणि गरीब रुग्णांकडून पैसे उकळण्याचे पाप करतात. हेच पाप त्यांना त्यांच्या आयुष्यात चांगलेच महाग पडते, अशी अनेक उदाहरणे आहेत की, डॉक्टरांची अवस्था ही खूप वाईट झालेली असते. शेवटी याच जन्मात केलेलं याच जन्मात फेडायचे असते. अनेक पापी डॉक्टर ते फेडतात तरीही सुधारत नाहीत त्याचे काय? उलट या मोठ्या डॉक्टरांच्या पापांमध्ये छोटे डॉक्टरही सहभागी असतात. तेच मोठ्या डॉक्टरांकडे पेशंट पाठवून त्याच्या आर्थिक परिस्थितीची ' टिप ' देतात व कमिशन उकळतात. हे रॅकेट महाभयावह असेच आहे. सध्या अलिशान खाजगी दवाखान्यांचे पेव फुटले आहे. या खाजगी दवाखान्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, डॉक्टरांना खाजगी कंपन्यांप्रमाणे टार्गेट दिले जाते. एवढी-एवढी ऑपरेशन झालीच पाहिजेत. अमुक-अमुक बिल झालेच पाहिजे. महिन्याला ठराविक रक्कम पेशंटकडून बिल रूपाने आलीच पाहिजे. असे सांगूनच टार्गेट पूर्ण करायला लावले जाते. मग हेच डॉक्टर नको त्यांना नको ते आजार सांगून नको त्या शस्त्रक्रिया करायला लावतात व त्यांना दिलेले टार्गेट पूर्ण करतात. हे सर्वांनाच माहित आहे. तरीही यावर कुणीही बोलत नाही हे विशेष. छोट्या-छोट्या आजारांसाठी या दवाखान्यांमध्ये अॅडमिट करायला लावले जाते. त्यानंतर दवाखान्यामधूनच पाण्याच्या बाटलीपासून ते नास्ता-जेवणापर्यंतचे अव्वाच्या सव्वा पैसे वसूल केले जातात. साधा ब्लड प्रेशर वाढला म्हणून दवाखान्यात गेलेल्या रुग्णाला घाबरवून ' एन्जोप्लास्टी ' करायला लावली जाते. कधी-कधी तत्काळ लाखो रुपये भरून शस्त्रक्रिया करायला सांगितले जाते. हार्टअॅटॅक आलेल्या रुग्णांशी तर हेच डॉक्टर कसायापेक्षाही वाईट पद्धतीने वागतात. त्यांना घर-दार जमिनी विकल्याशिवाय पर्याय नसतो. मग रुग्णांनी जमिनी विकून दिलेल्या पैशांवर हेच डॉक्टर जमिनी घेतात आणि आलिशान फार्म हाऊस बांधतात. आज ठाण्या-मुंबईतील डॉक्टरांनी करोडो रुपये खर्चून बांधलेली रिसॉर्ट व फार्महाउस पाहिली की,' या डॉक्टरने किती पेशंटला लुटले असेल ' असा विचार प्रत्येकाच्या मनामध्ये येतो. त्यातच सध्या मध्यमवर्गीयांच्या व नोकर वर्गाच्या डोक्यामध्ये ' मेडिक्लेम ' चे भूत भरलेले आहे. जवळपास सर्वांनीच मेडिक्लेम काढलेला असतो. हा ' मेडिक्लेम ' चा पेशंट म्हणजे हॉस्पिटल चालकांची पर्वणीच असतो. त्यांच्या हिशोबाने तो चांगला ' बकरा ' असतो. मग कारण नसताना त्या रुग्णाच्या नको त्या चाचण्या, नको ते उपचार व नको त्या शस्त्रक्रिया केल्या जातात. आणि ' मेडिक्लेम ' ची रक्कम पूर्ण होईपर्यंत उपचार अर्थात त्याच्या शरीरावर वेगवेगळे ' प्रयोग ' केले जातात. एवढे करूनही पेशंट खुश असतो कारण पैसे ' मेडिक्लेम ' देणाऱ्या कंपनीने भरलेले असतात. मात्र त्याच्या शरीराची डॉक्टरांनी वाट लावलेली असते, याकडे तो साफ दुर्लक्ष करतो, कोणत्या हॉस्पिटलला किती ' मेडिक्लेम ' च्या नावाने पैसा मिळालाय? याची चौकशी केली तर भ्रष्ट डॉक्टरांचे रॅकेट उघडकीस यायला वेळ लागणार नाही. पण करणार कोण? आज माझ्या शहरातील माझ्या मित्राच्या मुलाचे अर्थात निखिल राजेंद्र थोरात यांचे दुःखद निधन झाले. वयाच्या २५ व्या वर्षी साध्याशा आजाराने तरुण मुलगा निघून जातो. लाखो रुपये खर्चून ही त्याचा जीव वाचवू शकत नाही, ही बाब अस्वस्थ करणारी आहे, म्हणूनच या विषयाला हात घालावासा वाटला. या ' कट प्रॅक्टिस ' विरुद्ध आवाज उठवावासा वाटला. प्रत्येक पेशंटच्या नातेवाईकांनी सावधगिरी बाळगली आणि या काही डॉक्टरांच्या भ्रष्ट रॅकेट विरुद्ध आवाज उठवला तर अनेक कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील. खरं तर निखिल हा इंजिनियर होता. वाडा कॉलेज मध्ये शिक्षणही घेत होता. चांगला कलाकार होता. त्याचे स्वतःचे कलापथक होते. त्याचा मित्रपरिवारही मोठा होता. निखिलच्या जाण्याने सर्वच हळहळलेत. पण नुसती हळहळ व्यक्त करून उपयोग नाही. तर निखिलसाठी खरंच काही करायची इच्छा असेल तर त्याच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी एकत्र येऊन लुटारू डॉक्टरांविरुद्ध एक एक चळवळ उभी करायला हवी. निखिलच्या नावाने एक रुग्णांना आधार देणारी संघटना उभी राहायला हवी. अशी चळवळ, अशी संघटना की जी सर्वच रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन करेल, योग्य ती मदत मिळवून देईल व चुकीचे उपचार करायला,अव्वाच्या सव्वा बिल लावणाऱ्या, घाबरवून नको त्या शस्त्रक्रिया करायला लावणार्‍या, एका डॉक्टर कडुन दुस-या डॉक्टरकडे पाठवून कमिशन उकळणाऱ्या मेडिकल स्टोअर्स व लॅबधारकांकडून कमिशन घेणाऱ्या आणि चुकीचे उपचार करणाऱ्यांना योग्य तो धडा शिकवेल. या चळवळीला चांगल्या हेतूने काम करणाऱ्या व खरोखरच रुग्णांची सेवा करणाऱ्या ख-या डॉक्टरांनीही मदत करणे गरजेचे आहे, त्यांची मदत मिळाली तर ही चळवळ अनेक रुग्णांना जीवदान देईल, अनेक गरीब कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील आणि तीच खरी निखिल थोरात यांना श्रद्धांजली ठरेल
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment