जगाला 'सबका मालिक एक'चा संदेश देणाऱ्या शिर्डीच्या साईबाबांचं जन्मस्थळ परभणी जिल्ह्यातलं पाथरी की नगर जिल्ह्यातलं शिर्डी असा वाद सध्या सुरु आहे.
साईबाबांच्या जन्मस्थळ वादासंदर्भात शिर्डीचं शिष्टमंडळ, स्थानिक लोकप्रतिनिधी, यांची काल सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली. पाथरी साई जन्मस्थळ विकास आराखडा या नावातून साई जन्मस्थळ उल्लेख काढून टाकल्याचं मुख्यमंत्र्यांनी मान्य केलंय, अशी माहिती शिर्डीचे सेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिली. मात्र मुख्यमंत्र्यांनी 'पाथरी साईंचं जन्मस्थळ' हा उल्लेख मागे घेतल्याचा दावा पाथरीकरांना अमान्य आहे. त्यामुळे साईबाबांच्या जन्मस्थळावरच्या वादावर अद्याप कोणताही तोडगा निघाला नसल्याचं समजतं.
साईबाबा यांच्या जन्मस्थळावरुन सुरु झालेल्या वादावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (20 जानेवारी) शिर्डी येथील शिष्टमंडळाशी चर्चा केली आणि त्यात तीर्थक्षेत्र म्हणून पाथरीचा विकास करु असे आश्वासन दिल्याचे शिर्डीकरांनी सांगितलं. त्यामुळे त्यांचे समाधान जरी झाले असले तरी आज पाथरीकर आपली भूमिका ठरवणार आहेत. पाथरीमधील साई मंदिरात आज दुपारी बारा वाजता महाआरतीचं आयोजन करण्यात आले आहे. या महाआरतीला जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि सर्व सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. महत्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अद्यापही पाथरीकरांना चर्चेचे निमंत्रण न दिल्यामुळे पाथरीकर आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता आहे.
या वादामुळे दोन दिवसांपूर्वी शिर्डी बंद आंदोलन सुरु केलं होतं. या आंदोलनात 30 गावांनी सहभाग घेतला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारत पाथरी साईबाबांचं जन्मस्थान असल्याचं संबोधत या परिसराच्या विकासासाठी 100 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचा शिर्डीकरांनी जोरदार विरोध करत बंद पुकारला होता.
0 comments:
Post a Comment
Please add comment