![]() |
भाजीपाला पिकांच्या फळधारणेतील समस्या व उपाययोजना |
फळधारणा कमी होण्याची कारणे :
पिकांना आणि पिकांमधील विशिष्ट जातींना फुले येण्यासाठी ठराविक तापमान, दिवसाची लांबी किंवा सूर्यप्रकाशाचे तास यांची आवश्यकता असते. त्यांची पूर्तता न झाल्यास झाडांना फुले येत नाहीत आणि फळधारणा होत नाही.
वेलवर्गीय पिकांमध्ये नर आणि मादी फुले वेगवेगळ्या वेळी येतात. नरफुले आधी येतात आणि मादी फुले नंतर येतात. परपरागीकरण झाल्याशिवाय फळधारणा होत नाही. परपरागीकरणाचे काम मधमाशा, फुलपाखरे, वारा इत्यादी माध्यमातून होते. त्यांचा अभाव असल्यास फळधारणा कमी होते.
टोमॅटो, वांगी या भाजीपाला पिकांमध्ये पुंकेसर व स्त्रीकेसर परिपक्व अवस्थेत येऊन फळधारणा होण्यासाठी ठराविक तापमान आवश्यक असते. तापमान खूप कमी अथवा खूप जास्त असल्यास फळधारणा होऊ शकत नाही आणि फुलांची गळ होते.
कांद्याचे पिकांमध्ये बीजोत्पादनात पुंकेसर आणि स्त्रीकेसर एकाच वेळी तयार होत नाहीत. त्यामुळे या पिकांमध्ये परपरागीकरण आवश्यक असते. मधमाशांचा अभाव असल्यास आणि परपरागीकरण न झाल्यास कांद्यामध्ये बीजधारणा कमी होते.
फुले व फळधारणा होताना मोठ्या प्रमाणावर अन्नद्रव्यांची आणि पाण्याची आवश्यकता असते. याची कमतरता असल्यास फुलांची, फळांची गळ होते आणि फळधारणा होत नाही.
परपरागीकरण घडवून आणणार्या मधमाशांना अपायकारक ठरतील अशी किटकनाशके पिकावर फवारल्यास मधमाशांची कार्यक्षमता कमी झाल्यामुळे परपरागीकरण कमी होते. अधिक तापमानात मधमाशांची कार्यशक्ती घटते आणि त्याचा अनिष्ट परिणाम फळधारणेवर होतो.
फळधारणा वाढविण्यासाठी उपाययोजना :
भाजीपाला पिकांची लागवड योग्य हंगामात आणि योग्य वेळी करणे तसेच योग्य जातीची निवड करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे फळधारणा होण्यासाठी आवश्यक ते तापमान मिळते. या तापमानात किंवा विशिष्ट हंगामात ज्या जातींची शिफारस करण्यात आली आहे. अशाच जातींचा वापर करावा.
वेलवर्गीय पिकांमध्ये मादी फुलांचे प्रमाण वाढवून फळधारणा वाढविण्यासाठी शिफारस केलेल्या संजीवकांचा वापर करावा. तसेच कृत्रिम परागसिंचन करून फळधारणा वाढवता येते. काकडी पिकामध्ये 10 पीपीएम जिबरेलिक ऍसिड किंवा 10 पीपीएम मॅलिक हायड्रॅझाईड किंवा 50 पीपीएम इथ्रेल यापैकी कोणत्याही एका संजीवकाची फवारणी रोपे 2 ते 4 पानांवर असताना केल्यास मादी फुले लवकर येतात. त्यांची संख्या वाढते आणि पर्यायाने अधिक फळधारणा होऊन उत्पादन वाढण्क्षास मदत होते. संजीवकांचा वापर योग्य प्रमाणात करावा.
फुले येण्यापूर्वी पिकाला खतांचा वापर करावा आणि फुले येताना आणि फळधारणा होताना पाण्याचा ताण पडू देऊ नये.
फळांची गळ थांबविण्यासाठी मिरची, वांगी यासारख्या पिकांमध्ये सुरुवातीला नॅफ्थॅलिक ऍसेटिक ऍसिड (एन.ए.ए.) सारख्या संजीवकांचा वापर करावा.
रोग व किडींचे योग्य वेळी नियंत्रण करावे. पीक फुलोर्यात आल्यानंतर तसेच फुले येण्याच्या वेळी आणि फळधारणा होताना परपरागीकरण होणार्या पिकांमध्ये मधमाश्यांना अपायकारक असणारी किटकनाशके वापरू नयेत. भुकटी स्वरूपातील किटकनाशकांचा वापर टाळावा.
झाडांवर फळांची संख्या जास्त असल्यास पुढील फुलांमध्ये फळधारणा होत नाही. म्हणून वेळेवर तोडणी करून पिकाला नियमित अन्नपुरवठा आणि पाणीपुरवठा करणे आणि फळांची विरळणी करून घेणे आवश्यक आहे.
कांदा पिकात बीजधारणा वाढविण्यासाठी बीजोत्पादन घेण्यामध्ये मधमाशांच्या पेट्या ठेवल्यास परागीभवन वाढून बीजधारणा वाढण्यास मदत होते.
अशाप्रकारे योग्य काळजी घेतल्यास फळधारणा वाढविण्यास आणि उत्पादन वाढीस मदत होते.
0 comments:
Post a Comment
Please add comment