मनसेच्या विधानसभेच्या उमेदवाराने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण

मनसेच्या विधानसभेच्या उमेदवाराने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे.

मनसेच्या विधानसभेच्या उमेदवाराने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण

मनसेच्या विधानसभेच्या उमेदवाराने राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला मारहाण केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अंबरनाथ शहरात ऐन निवडणुकीत मनसेतली अंतर्गत नाराजी उफाळून आली होती. पक्षातले अनेक पदाधिकारी प्रचारातून गायब होते. यापैकी काही जण शिवसेनेचा छुपा प्रचार करत असल्याची तक्रारी वरिष्ठांकडे केल्या होत्या. त्यामुळे पक्षविरोधी काम करणाऱ्यांना काढून टाकणार असा इशारा मनसे नेते राजन गावंड यांनी दिला होता.  मनसे प्रमुख राज ठाकरेंना शिवीगाळ केल्यामुळे आपण ही मारहाण केल्याची कबुली मनसे उमेदवाराने दिली आहे. सुमेध भवार असं मारहाण करणाऱ्या मनसेच्या उमेदवाराचं नाव आहे. भाजपमध्ये असलेल्या भवार यांनी मतदारसंघ शिवसेनेला गेल्यानं मनसेत जाऊन विधानसभा निवडणूक लढवली. त्यावेळी भवार यांच्याकडे सचिन अहिरेकर हा स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होता. मात्र भवार मनसेत गेल्यानंतर अहिरेकर यांनी भवार यांच्याकडे काम बंद केलं होतं.

त्यानंतर शनिवारी भवार यांनी अहिरेकर यांना अंबरनाथच्या महात्मा गांधी शाळेजवळ भेटायला बोलावलं, तिथे या दोघांमध्ये झालेल्या वादानंतर भवार आणि त्यांच्या अंगरक्षकांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप अहिरेकर यांनी केलाय. अहिरेकर हे सध्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अंबरनाथ विधानसभा अध्यक्ष म्हणून कार्यरत असून त्यांना झालेल्या मारहाणीमुळे मनसे विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद निर्माण झाला आहे. तर अहिरेकर याने आपल्याला आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना शिवीगाळ केली. तसंच आपल्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळेच त्याला मारहाण केल्याची कबुली सुमेध भवार यांनी दिली आहे. याप्रकरणी भवार आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झाला असून अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी अहिरेकर यांनी केली आहे.

अंबरनाथमध्ये पक्षातील इच्छुकांना डावलून ऐनवेळी भाजपतून आलेल्या सुमेध भवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यामुळे पक्षातील एक मोठा गट नाराज झाला होता. नाराजांपैकी काही जण शिवसेनेचा छुपा प्रचार करत असल्याच्या तक्रारी वरिष्ठांकडे केल्या होत्या.




About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment