तयारी कलिंगड, खरबूज लागवडीची


कलिंगड, खरबूज लागवड जानेवारी महिन्यात सुरू होते. या लागवडीची तयारी आतापासूनच करावी. बाजारपेठेच्या मागणीनुसार जातींची निवड करावी.

कलिंगड, खरबूज वेलीच्या वाढीसाठी 23 ते 27 अंश सेल्सिअस तापमान आवश्‍यक असते. तापमान 18.3 अंश सेल्सिअस पेक्षा कमी किंवा 32.2 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असल्यास वेलीच्या वाढीवर व फळधारणेवर विपरीत परिणाम होतो. दमट हवामानामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो.

कलिंगड, खरबूज लागवड बाजारपेठेची मागणी पाहून जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान करावी. जातींची निवड बाजारपेठेच्या मागणीनुसार करावी.
खरबुजासाठी जमिनीची निवड करताना खोल, पाण्याचा निचरा होणारी गाळाची जमीन योग्य ठरते. भारी काळी जमीनही उपयुक्त ठरते; परंतु त्यामध्ये भरपूर प्रमाणात सेंद्रिय खत असणे तसेच पाण्याचा निचरा असणे आवश्‍यक असते. आम्ल धर्मीय जमिनीतही हे पीक तग धरू शकते.
कलिंगडासाठी रेताड, मध्यम काळी, पोयट्याची किंवा गाळाची आणि चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. जमिनीचा सामू 6.5 ते 7 च्या दरम्यान असावा. भारी जमिनी वेलींची वाढ जास्त होते. अशा जमिनीत पाण्याचा व जमिनीचा समतोल न साधल्यास फळांना भेंगा पडतात. शक्‍यतो जमीन चोपण अथवा अतिशय हलकी नसावी.
कलिंगड लागवडीसाठी जमीन नांगरून व कुळवून लागवडीसाठी तयार करावी. लागवडीसाठी चार मीटर अंतरावर पाट किंवा सऱ्या काढाव्यात. पाटाच्या दोन्ही बाजूस 90 से.मी. अंतरावर 30 सें.मी. लांब, 30 सें.मी रुंद व 30 सें.मी. खोल खड्डे करून त्यात 1 ते 1.5 किलो चांगले कुजलेले शेणखत आणि व 10 ग्रॅम कार्बारील (10 टक्के) पावडर मिसळून खड्डा भरावा.
खरबूज लागवडीसाठी उंच गादिवाफ्यामध्ये (दोन मीटर रुंद) कडेला बियांची पेरणी करावी किंवा दुसऱ्या पद्धतीमध्ये नदीच्या पात्रातील लागवडीमध्ये 1.5 ते 2.5 मीटर दोन्ही ओळीतील अंतर ठेवून 60 ते 75 सें.मी. व्यासाचे वर्तुळाकार खड्डे करावेत. या खड्ड्यामध्ये शेणखत 2 ते 2.5 किलो मिसळून बियांची पेरणी करावी.
एक हेक्‍टर कलिंगडाच्या व खरबूज लागवडीसाठी 2.5 किलो बियाणे पुरेसे होते. पेरणीपूर्व बियाण्यास प्रति किलो बियाण्यास तीन ग्रॅम थायरम या बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी.
चांगल्या उगवण क्षमतेसाठी बी रात्रभर कोमट पाण्यात भिजवून घेतल्यास उगवण चांगली होते. प्रत्येक ठिकाणी दोन चांगली जोमदार रोपे ठेवावीत.
जाती
कलिंगडाच्या सुधारित जाती - असाही यामाटो, शुगर बेबी, अर्का माणिक, अर्का ज्योती.
खरबुजाच्या अर्का राजहंस, अर्का जीत, पुसा शरबती, हरा मधू
खतमात्रा
रासायनिक खते देताना हेक्‍टरी 100 किलो नत्र (217 किलो युरिया), 50 किलो स्फुरद (312 किलो सिंगल सुपर फॉस्फेट) आणि 50 किलो पालाश ( 83 किलो म्युरेट ऑफ पोटॅश ) द्यावे.
खते देताना लागवडी पूर्वी युरिया 108 किलो, सिंगल सुपर फॉस्फेट 312 किलो आणि
मुरेट ऑफ पोटॅश 83 किलो ही खतमात्रा द्यावी. राहिलेल्या युरियाची अर्धी मात्रा 108 किलो एक महिन्यानंतर वेली शेंडा धरू लागल्यावर द्यावा. वेलीच्या खोडाभोवती बांगडी पद्धतीने खत द्यावे.

संपर्क - गजानन तुपकर 
(लेखक कृषी विज्ञान केंद्र, अकोला येथे कार्यरत आहेत)
About Gosip4U

Gosip4U is the digital wing of india - India's leading media and communications group with its interests spanning across country.

0 comments:

Post a Comment

Please add comment