विठ्ठल मंदिरात अनेक भाविक फोटो काढतात,सोशल मीडियावर गर्भगृहाचे चित्र आणि व्हिडियोच्या पार्श्वभूमीवर ही बंदी आहे. सुरक्षितता आणि धार्मिक कारणांमुळे मंदिराच्या आतील भागात छायाचित्रणास कठोरपणे बंदी असं कारण देत ही मोबाईल बंदी घालण्यात आली आहे. मात्र मंदिर परिसरात मोबाईल लॉकरच्या मार्गाने पैसे उकळले जाण्याचा प्रकार पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रच नव्हे, तर भारतातल्या आणि भारताबाहेरच्याही लाखो भक्तांचं लाडकं दैवत म्हणजे पंढरीचा विठुराया अर्थात विठ्ठल. दरवर्षी लाखो भाविक पंढरपूरला दर्शनासाठी हजेरी लावत असतात. मात्र, या भाविकांसाठी एक महत्त्वाचा निर्णय आता पंढरपूरच्या विठ्ठल मंदिर समितीने घेतला आहे.
आता विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली आहे. नवीन वर्षापासून म्हणजेच 1 जानेवारी 2020 पासून हा नियम लागू होणार आहे. याआधी महाराष्ट्रातल्याच शिर्डी देवस्थानामध्ये देखील अशाच प्रकारे मोबाईल नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.
सोमवारी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीची बैठक पार पडली. समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. मोबाईल फोनसोबतच मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमांसाठी लाऊड स्पीकरची परवानगी देखील नाकारण्यात आली आहे.
याआधी देखील मंदिरात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांकडून मोबाईल फोन नेण्यासाठी मनाई करण्यात येत होती. मात्र, आता समितीनेच तसा निर्णय जारी केला आहे.
पहिल्या टप्प्यात अधिकारी नियम भंग करणाऱ्या भाविकांना इशारा देतील. ते पुन्हा फोन वापरुन आढळल्यास, गॅझेट्स ताब्यात घेतील आणि व्हिज्युअल हटविले जातील.
0 comments:
Post a Comment
Please add comment